मनपाचे ९ भूखंड वाचवण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली; पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

सोलापूर महानगरपालिकेच्या नऊ मोक्याच्या भूखंडांना बीओटी तत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महानगरपालिकेत एकत्र येत पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना बीओटीसंदर्भातील सात विषयांवर निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते महानगरपालिकेत आले होते. मात्र, आयुक्त उपस्थित नसल्याने आंदोलकांनी प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शहरातील नऊ महत्त्वाच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या निर्णयाला कोणत्याही परिस्थितीत विरोध केला जाईल, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याचा दावा केला. महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असेल तर आम्हाला विचारा; १५० कोटी रुपयांचे उत्पन्न कसे वाढवायचे ते आम्ही सांगतो,” असे नरोटे यांनी सांगितले. महापालिकेची सुमारे २५ एकर जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय बीओटीच्या सात विषयांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. या जागांचा रेडी रेकनरनुसार मोठा आर्थिक मूल्य असल्याचे सांगत रामलाल चौकातील दोन शाळांच्या जागांचाही यात समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या जागांवरील आरक्षणाबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती सभागृहासमोर मांडलेली नाही, असा आरोपही नरोटे यांनी केला. संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्यावर निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याने या भूखंडांच्या विषयावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देणे हा पर्याय मान्य नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहराध्यक्ष शरणराज केंगनळकर, विष्णू कारमपुरी, महमद मुलाणी, राष्ट्रवादीचे शंकर पाटील, चंद्रकांत पवार, माकपचे युसुफ मेजर, मनसेचे अभिजित रामपुरे, आपचे निलेश सांगेपांग, माजी महापौर आरिफ शेख यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक राजकीय टोला

भूखंड, श्रीखंडाचे ज्ञान देणारी भाजप आता काय खातेय?” असा सवाल करत चेतन नरोटे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नऊ भूखंड बीओटीवर देणे हा योग्य पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.