‘बायकोचे अवशेष उद्या न्यायला सांग... मला शांततेत मरू दे’; माजी मिस पुणेचा वहिनीला शेवटचा मेसेज, काही मिनिटांत मृत्यूला मिठी

भोपाळमध्ये माजी मिस पुणे आणि मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयने भोपाळ न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मृत्यूपूर्वी काही मिनिटे आधी ट्विशाने आपल्या वहिनीला भावनिक मेसेज पाठवला होता. १२ मे रोजी रात्री ९ वाजून ३६ मिनिटांनी ट्विशाने वहिनी राशी अब्रोल शर्मा यांना मेसेज करत, पतीला तिच्या उरलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी घेऊन जाण्यास सांगण्याची विनंती केली होती. याआधी ट्विशाने पती समर्थ सिंगसोबतच्या वादाबाबत वहिनीशी फोनवर चर्चा केली होती.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, ट्विशाने पतीकडून मानसिक त्रास होत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्यावर मानसिक छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या डिजिटल ट्रेलनुसार, ट्विशाने मृत्यूपूर्वी कुटुंबीयांशी अनेकदा फोनवर संपर्क साधला. तिने वडिलांशीही संपर्क साधून पती आक्रमक आणि हिंसक झाल्याचे सांगितल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

यानंतर ट्विशा गच्चीकडे एकटी जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. तिचा आईसोबतचा शेवटचा आउटगोइंग कॉल रात्री १० वाजून ५ मिनिटांनी झाल्याचे तपासात समोर आले. वैद्यकीय तपासणीनुसार ट्विशाचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचा निष्कर्ष देण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात पती आणि सासूविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून तपासातील काही डिजिटल आणि सीसीटीव्ही पुरावे अद्याप मिळणे बाकी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.