रीलस्टार माधवी कुंभारला अटक; कोयत्याने हल्ला प्रकरणात ७ जण ताब्यात, जुन्या वादातून हल्ल्याचा पोलिसांचा अंदाज
पुण्यातील डेक्कन परिसरात रील क्रिएटरवर झालेल्या कोयता
हल्ल्याने खळबळ उडाली आहे. १५ ऑगस्ट रोजी पहाटे कॅफे फ्लाइंग जिप्सी येथे १९
वर्षीय अथर्व जगताप याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अथर्व गंभीर जखमी
झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रीलस्टार
माधवी कुंभारसह दोन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलालाही
ताब्यात घेण्यात आले आहे. अथर्वच्या जबाबानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात हत्येचा
प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कास पठार येथे कार ओव्हरटेक
करण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा
संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील माधवी आणि अथर्व यांच्यातील
संभाषणांचाही तपास केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ल्याचे
आधीच नियोजन करण्यात आले होते. आरोपी कॅफेमध्ये पोहोचल्यानंतर अथर्वला घेरून
त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्याच्या मानेवरही वार
झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका, हल्ल्यामागील कारण आणि शस्त्राचा वापर याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू
आहे.