ग्रामसभेत वादाचा थरार; ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने ग्रामसेवक अस्वस्थ, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेवरे दिगर येथे ग्रामसभेत झालेल्या वादानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामसभा सुरू असताना जुन्या कामांच्या बिलावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादामुळे मानसिक धक्का बसल्याने प्रल्हाद पाटील अस्वस्थ झाले आणि ग्रामसभेतून निघून घरी गेले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पारोळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी नेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.