प्रेझेंटेशनने बदलले समीकरण; बीओटी प्रस्तावावर सभागृहात एकमत

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीओटी प्रकल्पाच्या विषयावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असतानाच महापौर विनायक कोंड्याल यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या मांडणीमुळे चर्चेचे समीकरणच बदलले. ठरावावर थेट चर्चा सुरू करण्याऐवजी महापौरांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून बीओटी प्रकल्पाचे सविस्तर प्रेझेंटेशन सभागृहासमोर केले. प्रकल्पाची कार्यपद्धती, महापालिकेच्या मालमत्तांचा विकास, आर्थिक हित, प्रकल्पाची अंमलबजावणी, भविष्यातील सुविधा आणि नागरिकांना होणारे संभाव्य फायदे याबाबत नगरसेवकांना माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रस्तावातील आर्थिक आणि प्रशासकीय बाबी अधिक स्पष्ट झाल्या आणि चर्चेला विरोधाऐवजी प्रकल्पाच्या उपयुक्ततेची दिशा मिळाली. महापालिकेच्या मालमत्तांचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे आणि या उत्पन्नाचा उपयोग नागरी सुविधांसाठी करण्याचा उद्देश बीओटी प्रस्तावामागे असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शाळा आणि मैदानांना हात लावू नका : चेतन नरोटे

बीओटी प्रकल्पाबाबत नगरसेवक चेतन नरोटे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. शाळा आणि मैदान वगळता इतर व्यावसायिक जागा शहराच्या विकासासाठी विकसित करण्यास आपला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना खेळण्यासाठी मैदाने आणि शिक्षणासाठी शाळा आवश्यक असल्याने या आरक्षित जागांना हात लावू नये, अशी भूमिका नरोटे यांनी मांडली. या आरक्षित जागांवर विकास करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र शहराच्या विकासासाठी कमर्शियल जागांचा नियोजनबद्ध विकास करण्यास आपले एकमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३० कोटींच्या ठेवींचा मुद्दा सभागृहात

सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक अमोल शिंदे यांनी महापालिकेच्या सुमारे ३० कोटी रुपयांच्या ठेवींचा मुद्दा उपस्थित केला. या रकमेबाबत बँकेत ठेव आणि त्यातून मिळणाऱ्या व्याजाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या निधीवर योग्य व्याज मिळणे आवश्यक असून, यामध्ये विलंब झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते, असे शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ३० कोटी रुपयांची रक्कम तातडीने बँकेत ठेवण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे महापालिकेला दरमहा सुमारे १५ लाख रुपयांच्या व्याजाचा फायदा होऊ शकतो.

मागील बीओटी प्रकल्पांचा अनुभव लक्षात घेण्याची मागणी

नगरसेवक किसन जाधव, वैभव हत्तुरे, गणेश वानकर आणि शिवानंद पाटील यांनीही बीओटी प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. प्रकल्पाची सविस्तर माहिती घेऊन शहराच्या विकासासाठी तो उपयुक्त ठरत असल्यास पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. मात्र यापूर्वीचे काही बीओटी प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, मागील अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली. प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक, नियोजनबद्ध आणि महापालिकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणारी असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

एकमताने प्रस्ताव मंजूर

बीओटी प्रकल्पावरून सभागृहात गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असताना महापौर कोंड्याल यांनी आधी प्रकल्पाची माहिती देण्यावर भर दिला. प्रेझेंटेशननंतर नगरसेवकांसमोर प्रकल्पाचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले आणि त्यानंतर बीओटी प्रस्तावाला सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली. माहितीचे सादरीकरण, त्यानंतर चर्चा आणि अखेरीस सर्वानुमते निर्णय, अशी बीओटी विषयाची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे महापौर विनायक कोंड्याल यांच्या नियोजनबद्ध मांडणीची महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.