पांडवकडा धबधबा ठरतोय मृत्यूचा सापळा! आठवडाभरात दुसरा बळी; १६ वर्षीय प्रणव मिश्रा याचा बुडून मृत्यू
पनवेलजवळील खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा पावसाळी
पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र असला तरी आता पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे.
बुधवारी १९ ऑगस्ट रोजी धबधब्यात एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन
दलाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. सिडको अग्निशमन केंद्राला सायंकाळी ५ वाजून ४९
मिनिटांनी धबधब्यावर व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खारघर अग्निशमन
केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी धबधब्यात मोठ्या प्रमाणात पाणी
कोसळत असल्याने बचावकार्य अत्यंत धोकादायक परिस्थितीत करावे लागले. अग्निशमन
जवानांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता दगडाच्या कपारीत सुमारे १० ते १२ फूट खोलवर
एक तरुण अडकलेल्या अवस्थेत आढळला. जवानांनी प्रयत्नपूर्वक त्याला बाहेर काढले आणि
स्ट्रेचरच्या मदतीने डोंगराच्या खाली आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला
रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत प्रणव मिश्रा या १६ वर्षीय तरुणाचा
मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तो कुर्ला येथील रहिवासी असल्याचे समोर आले
आहे. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पांडवकडा धबधब्यावर पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो.
अशा परिस्थितीत पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक असतानाही काही पर्यटक सुरक्षेच्या
नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
अवघ्या एका आठवड्यात दुसरा बळी गेल्याने पांडवकडा धबधबा
पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी, कडक सुरक्षा व्यवस्था आणि
प्रभावी जनजागृती करण्याची मागणी आता जोर धरत आहे.