धक्कादायक! पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या; मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

मुंबईलगतच्या मुंब्रा परिसरात एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकण्यात आला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे मुंब्रा पोलिसांनी या ब्लाइंड मर्डरचा काही दिवसांतच उलगडा केला. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज मकसूद अली खान हा तरुण “कामासाठी दादरला जातो” असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. अखेर त्याच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिसांनी अरबाजच्या मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशनचा मागोवा घेतला. त्याचे शेवटचे लोकेशन वर्सोवा परिसरात आढळले. त्याचवेळी त्याची प्रेमिका मेहजबीन शेख हिचे लोकेशनही त्याच भागात असल्याचे समोर आल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी मेहजबीन शेख हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मेहजबीनने आपल्या पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांच्यासह अरबाजकडून पैसे उकळण्याचा आणि त्याची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली. पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपींनी अरबाजला वर्सोवा येथे बोलावले. त्यानंतर त्याचे हात बांधून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून मुंब्रा येथील निर्जन नाल्यात फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना अटक केली आहे. तर महिलेचा पती हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पठाण हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध हत्या, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.