राहुल गांधी, प्रणिती शिंदेंसह काँग्रेस खासदार ताब्यात; विद्यार्थी आंदोलनावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे पायी मोर्चा घेऊन निघाले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या इतर खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि सरकारने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात राहुल गांधी यांना पोलिसांनी ओढत नेत ताब्यात घेतल्याची घटना लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षाचा आवाज पोलिसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही करण्यात आली. काँग्रेसने सरकारवर संसदेत या विषयावर चर्चा टाळल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधितांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी, "गिरफ्तार करो, जेल में डालो, फर्क नहीं पड़ता. मोदी सरकार की सत्ता की ताकत से ज़्यादा बड़ी हमारे सत्याग्रह की शक्ति है," असे म्हणत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.