सोलापुरासाठी १४५५ कोटींच्या रिंगरोडसह चार विकासकामांना नितीन गडकरी यांची मंजुरी

सोलापूर :- सोलापूर शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चार मोठ्या विकासकामांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये १४५५ कोटी रुपयांच्या ३३ किमी लांबीच्या रिंगरोडसह भुयारी मार्ग आणि चारपदरी बाह्यवळण रस्त्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. अक्कलकोट येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार Devendra Kothe यांनी सोलापूर शहरातील विविध विकासकामांसंदर्भात निवेदन सादर केले. त्यानंतर गडकरी यांनी या मागण्यांना तातडीने मंजुरी देत सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला. आमदार देवेंद्र कोठे यांनी अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौक, महालक्ष्मी मंदिर आणि मल्लिकार्जुन नगर परिसरात वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी केली होती. तसेच अक्कलकोट रस्ता ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत सर्व्हिस रोड करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला होता. याशिवाय, सोलापूर शहराला जोडणारे अक्कलकोट, हैद्राबाद, तुळजापूर, पुणे आणि विजयपूर हे पाच प्रमुख महामार्ग एकत्र जोडण्यासाठी ६० मीटर रुंदीच्या रिंगरोडची मागणी करण्यात आली होती. या रिंगरोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, भाविक आणि प्रवाशांसाठीही प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. शहरातील वाढत्या जडवाहतुकीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हैद्राबाद रस्त्यावरील तांदूळवाडी ते विजयपूर रस्त्यावरील हत्तूरपर्यंत आणि तुळजापूर रस्त्यावरील काटगाव ते पुणे महामार्गावरील बाळेपर्यंत चारपदरी बाह्यवळण रस्ते उभारण्याची मागणीही करण्यात आली होती. या दोन्ही प्रकल्पांमुळे सोलापूर शहर वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाबाबतही सकारात्मक भूमिका मांडली. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १०२० कोटी रुपयांची मंजुरी देत लवकरच काम मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील डीपी रोडच्या प्रश्नावरही तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मार्ग काढण्याचा शब्द दिला. या मंजुरीमुळे सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार असून, भविष्यातील वाहतूक आणि औद्योगिक विकासासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.