हिमाचल प्रदेशात पावसाचं तांडव! १५५ जणांचा मृत्यू; २५९ रस्ते बंद, ८३५२ कोटींचं नुकसान

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यावर नैसर्गिक आपत्तीचे गंभीर संकट ओढावले आहे. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटरच्या ताज्या अहवालानुसार, पूर, भूस्खलन, झाडे व दगड कोसळणे तसेच रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये आतापर्यंत १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे राज्यातील २५९ मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. याशिवाय २५५ ट्रान्सफॉर्मर्स ठप्प झाल्याने अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका मंडी जिल्ह्याला बसला आहे. मंडीमध्ये तब्बल ८८ रस्ते बंद आहेत. तर कुल्लूमध्ये ३९ आणि शिमल्यातील १३ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

एकूण १५५ मृतांपैकी ६८ जणांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तींमुळे, तर पावसादरम्यान झालेल्या रस्ते अपघातांत ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंडी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक १४ जणांचा मृत्यू झाला असून चंबा जिल्ह्यात रस्ते अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील पायाभूत सुविधा, शेती आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचा एकूण आकडा ८३५२.६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठा फटका बसला असून जलशक्ती विभागाचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यात २१३ घरे पूर्णपणे तर ६२० घरे अंशतः उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच सुमारे २०० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाकडून रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मदत व बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.