मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'संवादवारी' ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन; वारकऱ्यांसाठी शासन योजनांची माहिती एकाच ठिकाणी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 'संवादवारी' ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते.

आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी निर्णयांची माहिती वारकऱ्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी, यासाठी 'संवादवारी' हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. शासन आणि जनतेमधील संवाद अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या विशेष दालनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नवीन शैक्षणिक धोरण २०२०, महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, लेक लाडकी योजना, पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, जलयुक्त शिवार, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, हरित ऊर्जा, कौशल्य विकास, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण यासह विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आकर्षक एलईडी चित्ररथ, पथनाट्य, प्रदर्शन आणि दृकश्राव्य माध्यमांद्वारे शासनाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात येत असून वारकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.