लोधी समाज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सन्मान
सोलापूर : विजापूर रोड येथील शासकीय मैदानावर जय विजय क्रिकेट
क्लबच्या वतीने कै. ईश्वरदादा शिवशिंगवाले यांच्या स्मरणार्थ तसेच लोधी समाजाच्या
आषाढ सणानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सोलापूरचे महापौर विनायक
कोंड्याल यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेत विविध क्रिकेट संघांनी उत्स्फूर्त
सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यानंतर विजेत्या आणि
उपविजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रथम क्रमांक
पटकाविणाऱ्या जय दंडे हनुमान संघाला १५ हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह
देऊन गौरविण्यात आले. तर रघुवंश संघाला उपविजेतेपदासाठी ११ हजार रुपये रोख
पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल
यांनी जय विजय क्रिकेट क्लबचे क्रिकेटर सुरेशदादा शिवशिंगवाले यांच्या पुढाकाराचे
आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. युवकांना एकत्र आणण्यासाठी तसेच त्यांच्या
क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण
असल्याचे त्यांनी सांगितले.
खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन
विकसित होतो, त्यामुळे भविष्यातही अशा क्रीडा
स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे
महापौरांनी यावेळी सांगितले.
विजेता आणि उपविजेता संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून
महापौरांनी त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेत
सहभागी झालेल्या सर्व संघांच्या खेळाडूंचेही उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करण्यात
आले. कार्यक्रमास नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर,
यशवंत पाथरूट, लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग
कडावले, क्रिकेटर सुरेशदादा शिवशिंगवाले, घनश्याम शिवशिंगवाले, नागनाथ शिवशिंगवाले, जयसिंग शिवशिंगवाले, किशोर वटवटवाले, रमेश वाडीवाले, शंकर पवार, अनिल
गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय विजय क्रिकेट क्लबचे
पदाधिकारी, आयोजक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे
मान्यवरांनी अभिनंदन केले. लोधी समाजाच्या आषाढ सणानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे
युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा
आणि सामाजिक एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.