पुण्यातील फ्लाईंग जिप्सी कॅफे प्रकरणात मोठी कारवाई; रक्ताचे डाग धुवून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह दोघांना अटक
पुणे : डेक्कन परिसरातील फ्लाईंग जिप्सी कॅफेत रीलस्टार अथर्व
जगताप याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आता कॅफे व्यवस्थापनावरही
कारवाई केली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी सांडलेले रक्त पाण्याने धुवून पुरावा नष्ट
केल्याच्या आरोपावरून कॅफे मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
हेमंत आनंद पाटील (४१) आणि प्रेम
दीपक पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना २२
ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हल्ल्यानंतर रक्ताचे डाग धुतल्याचा आरोप
१५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास फ्लाईंग जिप्सी
कॅफेत रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर कोयत्यासह धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात
आला होता. हल्ल्यात जखमी झालेला अथर्व कॅफेतच कोसळला होता. पोलिसांच्या तपासात
हल्ल्यानंतर फरशीवर पडलेले रक्त कॅफे मालक आणि व्यवस्थापकाने पाण्याने धुवून
टाकल्याचे समोर आले. तसेच कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यास टाळाटाळ
केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरील पुरावा
नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम
२३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कॅफे पुन्हा सुरू केल्याचा आरोप
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या माहितीनुसार, गंभीर हल्ल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळ सुरक्षित ठेवणे आणि पोलिसांना
तातडीने माहिती देणे कॅफे व्यवस्थापनाचे कर्तव्य होते. मात्र रक्ताचे डाग
धुतल्यानंतर कॅफे पुन्हा सुरू करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
परवानग्यांबाबतही पोलिसांची चौकशी
फ्लाईंग जिप्सी कॅफे बंगल्याच्या आवारात सुरू करण्यात
आल्याचे तसेच आवश्यक परवानग्यांबाबतही प्रश्न उपस्थित झाल्याची माहिती पोलिसांनी
दिली. कॅफे निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवण्यात येत असल्याचेही तपासात
समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापना सील करण्याबाबत
पोलिसांनी पुणे महापालिकेला पत्र दिले आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दोन तरुणींसह सात
जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले
आहे. आता पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून कॅफे मालक आणि व्यवस्थापकावरही कारवाई
झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.