NEETच्या अभ्यासाच्या तणावातून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; पालकांसाठी चिठ्ठी लिहून घेतला टोकाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावातून वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सूरज सुभाष शिंदे (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने घटनेच्या वेळी सूरजच्या कुटुंबातील सर्व सदस्य कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांना संशय आला. यानंतर सूरजच्या लहान बहिणीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता तो गंभीर अवस्थेत आढळून आला. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने त्याला वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

पालकांसाठी भावनिक चिठ्ठी

सूरज NEET परीक्षेची तयारी करत होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. घटनेपूर्वी त्याने पालकांसाठी चिठ्ठी लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले. या चिठ्ठीत पालकांची माफी मागत त्याने त्यांना काळजी घेण्याचे आणि आनंदी राहण्याचे आवाहन केले होते. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.