अकलूज पोलिसांची मोठी कारवाई; १७ पिस्तूलांसह ४७ जिवंत काडतुसे जप्त, सहा आरोपी अटकेत

सोलापूर : अकलूज पोलिसांनी अवैध अग्निशस्त्रांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १७ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि वाहन असा एकूण ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मध्य प्रदेशातून शस्त्रांचा पुरवठा वजाळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही पिस्तुले आणि काडतुसे राहुल सतीश माने याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली. पुढील तपासात या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून होत असल्याचे समोर आले. पोलिसांना अनिल मेहता हा धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे शस्त्रे देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सोनगीर येथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता चार अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यानंतर टेंभुर्णी परिसरात कारवाई करून राहुल सतीश माने यालाही अटक करण्यात आली. राहुल माने हा सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

विविध ठिकाणी शस्त्रांची विक्री

तपासादरम्यान विकास वजाळे याने शस्त्रे विविध व्यक्तींना विकल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत विविध आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणजी, प्रदीप पांडुरंग माने, शनि भारत बनसोडे आणि सुमित नाना लवटे यांच्याशी संबंधित तपासातही शस्त्रे जप्त करण्यात आली. राहुल सतीश माने याने दिलेल्या माहितीनुसार सहा पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सहा आरोपी अटकेत, दोघे फरार

या कारवाईत विकास कैलास वजाळे, राहुल सतीश माने, महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणजी, अनिल पंचलाल मेहता आणि सुमित नाना लवटे या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर प्रदीप पांडुरंग माने आणि शनि भारत बनसोडे हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पिस्तूल अथवा जिवंत काडतुसे बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, , २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकलूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत. अवैध अग्निशस्त्रे, शस्त्रे तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाईची मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.