केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील एम्समध्ये दाखल, प्रकृती स्थिर

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्सकडून नड्डा यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. डॉक्टरांनी कोरोनरी अँजिओग्राफीसह काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या नड्डा यांची प्रकृती स्थिर असून, कार्डिओलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रकृती बिघडण्यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी जे. पी. नड्डा यांनी कुटुंबीयांसह घरी तिरंगा फडकावला होता. ‘हर घर तिरंगा’ अभियानात देशवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. नड्डा यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्या लवकर प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.