पालकमंत्री पदांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच

महायुती सरकारला दणदणीत यश मिळाल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटप पार पडले आहे. बरेचसे मंत्री खाते वाटपानंतर नाराज झाले आहेत. प्रत्येकालाच मलाईदार खाते हवे असल्याने ही नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. मंत्रिपद मिळाले परंतु खाते चांगले मिळाले नाही ही तक्रार बहुतांश मंत्र्यांची आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे गेल्या अडीच वर्षांतील संकटमोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे सहकारी गिरीश महाजन यांचेही खाते बदलण्यात आल्यामुळे त्यांनाही धक्का बसला आहे. मंत्रिपदाचा पदभार सर्वांनीच स्वीकारला आहे. मात्र 'कही खुशी कहीं गम' असेच वातावरण आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून देखील त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धनंजय मुंडे भविष्यात डोकेदुखी ठरण्याची शक्यता जास्त आहे. पुण्यामध्ये अजित पवार यांना पालकमंत्री पद हवे आहे. अजित पवार यांच्या अनेक समर्थकांनी पुण्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली असल्याने तसेच जिल्हा परिषदेत अजित पवार गटाचे प्राबल्य असल्याने त्यांना पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्याची अजिबात इच्छा नाही. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघातून निवडून आल्याने आता ते बऱ्यापैकी पुणेकर झाले आहेत. चंद्रकांत दादांवर विरोधक हिणकस भाषेत टीका करतांना दिसतात. मात्र संघ परिवाराच्या मुशीतून तयार झालेले चंद्रकांत पाटील अशा टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत न पडता त्यांचे काम करीत राहतात. त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. मात्र पालकमंत्री म्हणून त्यांचा विशेष प्रभाव दिसला नाही. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे हे देखील पुन्हा पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळाली परंतु आता या चौघांपैकी पालकमंत्री कोण होणार यामध्ये रस्सिखेच चालू आहे. पालकमंत्री पदाचे वाटप करण्यासाठी आता महायुतीने नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. भाजप, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यापैकी ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्या-त्या जिल्ह्यातून निवडून आले असतील त्याच पक्षाला पालकमंत्री पद देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालकमंत्रीपदांचे वाटप सुरळीत झाल्यानंतर महामंडळांचे अध्यक्ष निवडले जातील. नागपूर येथे एका फटक्यात ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ देऊन फडणवीस सरकारने षट्‌कार मारला आहे. मंत्रिपदाचे गाजर दाखवत पाच वर्षे काम करीत राहायचे हा फंडा आता फडणवीस यांना अमलात आणण्याची गरज नाही.

सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर महायुतीचे म्हणजे भाजपचे पाच आमदार जिल्ह्यातून निवडून आले आहेत. मात्र मंत्रिपदासाठी कोणाचाही विचार केला गेला नाही. दोन्ही देशमुखांनी आपापली सुभेदारी सांभाळत निवडून येण्याची किमया करून दाखवली असली तरी त्यांच्याबाबत श्रेष्ठींच्या मनात किंतु परंतु आहे, हेच स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट येथील सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त अनेक वाहिन्यांनी छातीठोकपणे दिले होते. अर्थात तिसऱ्यांदा आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांना देखील मंत्रिपदाने हुलकावणीच दिली होती. जिल्ह्यातील कोणालाही मंत्रिपद मिळालेले नसले तरी विकास करण्यासाठी मंत्रिपदाची गरज असते असे नाही. देवेंद्र कोठे या युवा आमदाराने आता मोठा प्रकल्प सोलापूर जिल्ह्यात आणण्यासाठी धडपड करणे आवश्यक आहे.