श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; बरगडीच्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव, स्थिती स्थिर

भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाल्यानंतर सध्या सिडनीतील रुग्णालयात दाखल असून, तो अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. शनिवारी (२५ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवरून धावत अ‍ॅलेक्स कॅरीचा अप्रतिम झेल घेताना डाव्या बरगडीला दुखापत केली. लगेचच तो मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस गेल्या काही दिवसांपासून ICU मध्ये आहे. स्कॅन रिपोर्टमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव आढळल्यानंतर त्याला ताबडतोब दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, संसर्ग टाळण्यासाठी त्याला दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याचे तापमान, नाडीचा वेग आणि रक्तदाबात चढउतार होत होते. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने कोणतीही जोखीम न घेता त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याचा प्रतिसाद सकारात्मक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अय्यरला पूर्ण बरा होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या पुनरागमनासाठी नेमका कालावधी सांगता येत नाही. तो भारताच्या टी२० संघाचा भाग नसल्याने त्याला सिडनीत विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. क्रिकेट विश्वात अय्यरच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.