महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला दिलासा; पंजाब शस्त्र तस्करी प्रकरणात मिळाला जामीन, सुप्रिया सुळेंनी मानले भगवंत मान यांचे आभार

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.
पंजाब शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झालेल्या सिकंदर शेखला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पंजाब पोलिसांनी पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्र पुरवठ्याच्या आरोपाखाली सिकंदर शेखसह चौघांना अटक केली होती.

 न्यायालयाचा निर्णय:

सिकंदर शेखच्या नावावर यापूर्वी कोणताही गुन्हा नव्हता. तो देशातील एक प्रसिद्ध पैलवान असून महाराष्ट्र केसरी किताब विजेता आहे. हे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. उर्वरित तीन आरोपींवर पूर्वीपासून खंडणी आणि इतर गंभीर गुन्हे असल्याने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

 सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया:

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात एक्स (Twitter) वर पोस्ट करत पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल.” त्यांनी पुढे लिहिले की, “या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी खूप सहकार्य केले. तसेच सिकंदरच्या वकिलांनी त्याची बाजू व्यवस्थित मांडून त्याला जामीन मिळवून दिला, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.”

 राजकीय हस्तक्षेप आणि संपर्क:

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांना फोनवरून सिकंदर शेखबाबत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्री मान यांनी योग्य तपास व न्यायाची हमी दिली होती.

 गुन्ह्याचे पार्श्वभूमी:

पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी १.९९ लाख रुपये रोख, पाच पिस्तुले, काही काडतुसे आणि दोन SUV गाड्या (Scorpio-N XUV) जप्त केल्या होत्या. या प्रकरणी खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कोण आहे सिकंदर शेख?

सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता असून राज्यातील कुस्तीविश्वातील एक मान्यवर नाव आहे. तो पुणे आणि मराठवाडा भागातील अनेक स्पर्धांमध्ये विजयी ठरलेला आहे. कुस्ती क्षेत्रात त्याने महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे.