सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांचा बंडाचा सुर – दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध
सोलापूर: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप
प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून, "घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष
प्रवेशाचा निषेध" असा आवाज उठवला जात आहे. एका कार्यकर्त्याने फेसबुक
पोस्टमध्ये लिहिले आहे, “आम्ही रक्ताचे पाणी करून या
लोकांशी संघर्ष केला. आता हेच लोक आमच्या डोक्यावर बसणार असतील, तर ते चुकीचे आहे.” कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी
करत सांगितले की, “भाजपमध्ये दिलीप माने यांचा प्रवेश
मान्य नाही. आम्ही आयुष्यभर संघर्ष केला, लाठ्या-काठ्या
झेलल्या आणि आता कलंकित लोक पक्षात येत आहेत.”
शहराध्यक्षांनी घेतली समजूत
या आंदोलनाची दखल घेत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी
घटनास्थळी पोहोचून कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यांनी सर्वांची मते ऐकून घेतली
आणि सांगितले, “प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या चर्चेनंतरच असे निर्णय घेतले जातात.
शहर संघटनेचा यात फारसा सहभाग नसतो.” त्या पुढे
म्हणाल्या, “पार्टीने जर एखाद्या मोठ्या नेत्याला प्रवेश
दिला असेल, तर काही राजकीय समीकरणे लक्षात घेऊन निर्णय
घेतलेला असतो. पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या सर्व भावना लक्षात घेऊन योग्य
निर्णय घेतील.”
राजकीय पार्श्वभूमी दिलीप माने हे सोलापूरमधील काँग्रेसचे
माजी आमदार असून, स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव आहे.
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर भाजपमध्ये असंतोष आणि अंतर्गत गटबाजी तीव्र
होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.