कार्तिकी एकादशीला एसटी कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान; प्रवाशाचे प्राण वाचवून दाखवली मानवतेची सेवा
पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीला
श्रद्धाळूंची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. अशाच वेळी फलटण आगारातून
पंढरपूरकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे
एका प्रवाशाचा जीव वाचला. ही घटना सोमवार (२४ ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास
घडली. फलटण आगाराची एसटी बस पंढरपूरकडे निघाली होती. त्यात एमएसईबीचे माजी अधिकारी
भरत भोसले विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रवास करत होते. बरड गावाच्या पुढे जाताच भोसले
यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी शेजारील प्रवाशाला तब्येत बिघडल्याची
कल्पना दिली. त्या प्रवाशाने तातडीने वाहकाला माहिती दिली. वाहकाने तत्काळ चालकाला
ही बाब सांगितली. त्या वेळी रस्त्यावर कार्तिकी यात्रेमुळे मोठी वर्दळ होती, तरीही चालकाने शांतपणे आणि तत्परतेने गाडी चालवत अवघ्या २४ किलोमीटर
अंतरावर असलेले नातेपुते गाठले. तिथे पोहोचल्यावर दोघांनी मिळून स्थानिक
रिक्षाचालकाच्या मदतीने भोसले यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. दरम्यान,
रिक्षाचालकाने प्रवाशाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. योगायोगाने
त्यांचा पुतण्या डॉक्टर निघाला. त्याने तातडीने स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधून
योग्य उपचार मिळवून दिले. या सर्वांच्या तत्परतेमुळे आणि मानवीतेच्या भावनेमुळे
भोसले यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानत
सांगितले, “संकटात विठ्ठलच धावून आला!”