शरद पवारांचा इशारा: “मतदानातील चोरी थांबवणारच”; सत्याच्या मोर्चात लोकशाही रक्षणाचा निर्धार

मुंबई:  आज मुंबईत काढण्यात आलेल्या “सत्याच्या मोर्चा”त राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले. निवडणूक आयोगाविरोधात आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आयोजित या मोर्चाने मुंबईच्या काळा घोडा परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण केले. पवारांनी जुन्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली आणि लोकशाही टिकवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

 शरद पवार म्हणाले: आजच्या मोर्चाने महाविद्यालयीन काळातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून दिली. तेव्हा जशी जनतेची एकजूट होती, तशीच भावना आज पुन्हा दिसली. आम्ही स्वतःसाठी काही मागत नाही, पण लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारासाठी हा लढा आहे,” असे पवारांनी स्पष्ट केले.

 सत्तेचा गैरवापर आणि निवडणुकीवरील शंका: पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीतील प्रकारांमुळे सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वास डळमळीत झाला आहे. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो. राजकीय मतभेद असू शकतात, पण मतांचा अधिकार आणि लोकशाहीचे संरक्षण हे सर्वांचे समान कर्तव्य आहे.”

 बनावट आधार प्रकरण आणि प्रशासनावर टीका:शरद पवारांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले. ते म्हणाले, “एका ठिकाणी बनावट आधार कार्ड तयार केल्याची माहिती देण्यात आली. संबंधित व्यक्तीने पुरावे दाखवले तरी उलट त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला. हा कुठला न्याय? शासन अशा प्रकारांना संरक्षण देत आहे. म्हणून काहीही झाले तरी आम्ही ही मतदानातील चोरी थांबवणारच,” असा इशारा त्यांनी दिला.  एकतेचे

 आवाहन: मोर्चात विविध विचारधारांचे पक्ष सहभागी झाले होते. यावर पवार म्हणाले, “आज विचार वेगळे असले तरी देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल, मतदारांचा अधिकार जपायचा असेल, तर सर्वांनी एकत्र यायला हवे.”