पुण्यात बिबट्याची दहशत; २० दिवसांत तीन बालकांचा मृत्यू, हेमंत ढोमेचा स्थानिक नेत्यांना सवाल
पुण्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या
हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड
परिसरात नरभक्षक बिबट्याने गेल्या २० दिवसांत तीन जणांचा बळी घेतला आहे. या
घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून, मंचर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात
आलं. या आंदोलनामुळे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी वनविभाग आणि प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
हेमंत
ढोमेचा संताप:
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे याने या घटनेवर एक्स (Twitter) वरून पोस्ट शेअर करत प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर सवाल उपस्थित केला आहे. त्याने लिहिलं — “गेल्या काही दिवसांत माझ्या भागात ११ मृत्यू झाले आहेत… चित्र खूप भयानक आहे… लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. आता सहनशक्तीचा अंत होतोय. लोक कायदा हातात घेण्याआधी ‘human-wildlife conflict’ वर शाश्वत उपाययोजना आणि कायदे आखले जावेत.” ढोमे पुढे म्हणतो, “जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भूमीमालकांचं जगणं कठीण झालंय. हे आहेत माझ्याच शेतातले आजचे ताजे ठसे… एक अमोल कोल्हे सोडल्यास बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मश्गुल आहेत, हे कोणास ठाऊक?” सोबतच त्याने आपल्या शेतातील बिबट्याचे ठसे दाखवणारा फोटो देखील शेअर केला आहे.