फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर; ४८ तास तो कुठे होता उघड
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला
डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी पीएसआय गोपाळ बदने अखेर पोलिसांसमोर आला आहे.
डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर बदने तब्बल ४८ तास फरार होता. पोलिसांनी
त्याचा शोध सर्वत्र सुरू केला होता. अखेर शनिवारी रात्री साडेबारा वाजता बदनेने
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. निलंबित पीएसआय गोपाळ बदनेचे नाव मृत
डॉक्टरने तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. त्या नोटमध्ये
बदनेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. या प्रकरणानंतर त्याने पलायन केले होते. एबीपीच्या
अहवालानुसार, बदनेचा शेवटचा ठावठिकाणा पंढरपूर होता.
तिथून तो सोलापूरला गेला, त्यानंतर बीड जिल्ह्यातील घरी
पोहोचला. मात्र, नंतर पुन्हा पंढरपूरमार्गे फलटणला परत आला
आणि पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, पोलिसांनी बदनेच्या
कुटुंबीयांना कळवले होते की, जर तो हजर झाला नाही तर त्याला
सेवेतून बडतर्फ केले जाईल. या इशाऱ्यानंतरच त्याने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे
समजते. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आरोपी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ
बदने यांना अनेक वेळा फोन केले होते. त्या दिवशी प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणी
यांच्यात वाद झाल्यानंतर ती लॉजमध्ये राहण्यासाठी गेली आणि तणावाखाली आत्महत्या
केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी याआधीच अटक केली
आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त
केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.