इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; पोलिसांत तक्रार नोंद

इंदोर : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सध्या भारतात सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंसोबत गुरुवारी सकाळी इंदोरमध्ये एक गंभीर घटना घडली. हॉटेल रेडिसन ब्लूहून ‘द नेबरहूड’ कॅफेकडे जात असताना, एका दुचाकीस्वाराने त्यांच्या मागे येत अयोग्यरित्या स्पर्श केला आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. ही घटना खजराणा रोड परिसरात सकाळी सुमारे ११ वाजता घडली. पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला दुचाकीस्वार काही काळ त्या खेळाडूंच्या मागे लागला होता. अचानक तो पुढे येऊन एका खेळाडूला अयोग्य स्पर्श करून वेगाने पळून गेला. या घटनेने दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी लगेच संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जवळच असलेल्या एका स्थानिक व्यक्तीने या प्रसंगात मदत केली. त्याने खेळाडूंना धीर देत पोलिसांना फोन करून माहिती दिली. परदेशी खेळाडूंशी संबंधित असल्याने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली. सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांनी इंदोर एमआयजी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या कॅमेर्‍यांमधून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे भारतातील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अधिक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.