भारताकडून चीनला निर्यातीत २२% वाढ; ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
नवी दिल्ली : रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५०% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले होते. यामुळे भारतीय व्यापारावर मोठा आर्थिक परिणाम झाला होता. तथापि, आता भारताकडून चीनकडे होणाऱ्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असून, हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का आणि भारतासाठी दिलासादायक विकास मानला जात आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत सुमारे २२% वाढ झाली आहे. या वाढीत प्रमुख भूमिका टेलीफोन सेट, झिंगा, ॲल्युमिनियम आणि शिमला मिरची सारख्या वस्तूंनी बजावली आहे. चीनच्या भारताप्रती बदललेल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि दोन्ही देशांतील व्यापारसंबंध सुधारल्याने हा वाढीचा कल दिसून आला आहे.
🔹 झिंगा उद्योगाला मोठा दिलासा
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय झिंगा उद्योगाला मोठा फटका बसला होता. त्या काळात अमेरिका-भारत हवाई मालवाहतूक निर्यातीत १४% घट झाली होती, तर आंध्र प्रदेशातील झिंगा उत्पादकांना सुमारे २५,००० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. जवळपास ५०% निर्यात ऑर्डर्स रद्द झाल्या होत्या. मात्र आता, चीनकडून झिंगा आणि समुद्री उत्पादनांना वाढती मागणी निर्माण झाल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा आधार मिळाला आहे.
🔹 चीनच्या राजदूतांची प्रतिक्रिया
भारतातील चीनचे राजदूत श फीहोंग यांनी ‘एक्स’
(पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले . “२०२५-२६ या अर्थवर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताकडून चीनला होणारी
निर्यात २२% वाढली आहे. चीन भारतीय ‘प्रीमियम’ वस्तूंना आपल्या बाजारपेठेत अधिक
जागा देईल.” हा बदल भारत-चीन व्यापारसंबंधांमधील सकारात्मक संकेत मानला जात आहे.