महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा: मुख्य आरोपी रवी उप्पल दुबईतून बेपत्ता, प्रत्यार्पण प्रक्रिया थांबली

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा (Mahadev Online Betting Scam) हा देशातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकींपैकी एक ठरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक रवी उप्पल डिसेंबर २०२३ मध्ये दुबईत अटक झाला होता. इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटिसच्या आधारे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होणार होतं, मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच तो बेपत्ता झाला आहे.

 प्रत्यार्पण प्रक्रिया प्रलंबितच

यूएई प्रशासनाने भारताकडून प्रत्यार्पणासाठी मागितलेली कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने प्रक्रिया अडकली. ईडीने (ED) सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला असला तरी ४५ दिवसांनंतर उप्पलची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली होती, परंतु आता तो दुबईतून गायब झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

 रवी उप्पलकडे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व

ईडीच्या माहितीनुसार, रवी उप्पलकडे वानुआटू (Vanuatu) या दक्षिण प्रशांत महासागरातील बेट राष्ट्राचा पासपोर्ट आणि नागरिकत्व आहे. याच देशाचा पासपोर्ट ललित मोदींकडे देखील होता. वानुआटूने नंतर मोदींचा पासपोर्ट रद्द करून स्पष्ट केलं होतं की प्रत्यार्पण टाळण्यासाठी नागरिकत्व मिळवणं हे वैध कारण नाही’.

 सहकारी अजूनही ताब्यात

रवी उप्पलचा सहकारी सौरभ चंद्राकर सध्या दुबई अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उप्पलने प्रत्यार्पण टाळण्यासाठी वानुआटूमध्ये आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 २०० कोटींचा दररोज नफा

२०१८ मध्ये स्थापन झालेलं महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप दररोज तब्बल २०० कोटी रुपयांचा नफा कमवत असल्याचा आरोप आहे. ईडीच्या मते, या अॅपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर सायबर बेटिंग नेटवर्क चालवलं जात होतं.