पावसाळा संपला तरी कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

अक्कलकोट: पावसाळा औपचारिकरीत्या संपत आला   असला तरी तुळजापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरनूर धरणामध्ये मागील दोन दिवसांपासून पाण्याची आवक पुन्हा वाढली आहे. त्यामुळे धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, शनिवारी ६०० क्युसेक इतका तर सोमवारी ३०० क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. बोरी आणि हरणा या दोन्ही नद्यांद्वारे येणारे पाणी धरणामध्ये मिसळत असल्याने सध्या आवक कायम आहे. धरणाखालील आठ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी अक्कलकोट येथील बंधाऱ्यांवर प्लेट्स टाकण्यात आल्या असून, उर्वरित बंधाऱ्यांवर प्लेट टाकण्याचे काम सुरू होणार होते. मात्र धरणातून विसर्ग सुरू असल्याने हे काम काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात आले आहे. पाण्याची आवक थांबल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पुन्हा प्लेट टाकण्याचे काम हाती घेतले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून कुरनूर धरणातून सातत्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. काही शेतकऱ्यांमध्ये “धरण दोन वेळा भरून तेवढेच पाणी खाली वाया गेले” अशी चर्चा सुरू आहे. यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने धरण क्षमतेने भरले, तर अनेक वेळा पूरस्थितीही निर्माण झाली. तरीही प्रशासनाने योग्य वेळी पाणी सोडून परिस्थिती आटोक्यात आणली. अनेक ठिकाणी  रस्ते बंद पडले, पूल पाण्याखाली गेले, परंतु अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे कोणतीही  मोठी हानी झाली नाही. सध्या कुरनूर धरण १०० टक्के क्षमतेने भरले असून वरून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानंतर विसर्ग थांबवला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. यामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. धरणातील भरपूर पाणीसाठ्यामुळे अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही शहरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून या भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत होती. परंतु यावर्षीच्या मुबलक पावसामुळे आणि धरण क्षमतेने भरल्याने नागरिकांना पुढील काही महिने पाण्याबाबत दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा साठा झाल्याने नगरपरिषदेचे नियोजन सुलभ होणार आहे. दरम्यान, पडलेल्या मोठ्या पावसामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. अनेक गावांतील विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाण्याची पातळी वर आली असून, याचा फायदा हिवाळी हंगामातील पिकांना होणार आहे. काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे कृषी आणि पाणीपुरवठा दोन्ही क्षेत्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.