अनैतिक संबंधातून विवाहितेचा निर्घृण खून; आरोपी स्वतः पोलिसात हजर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक भीषण खून प्रकरण उघडकीस आले आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणारी पूनम बालाजी निरफळ (वय ३५) हिचा अनैतिक संबंधातून केतन प्रकाश जैन या आरोपीने खून केला आहे. आरोपीने प्रथम स्टोलने गळा आवळून, त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर तब्बल १६ वार आणि पाठीवर एक वार केला. शवविच्छेदनात ही माहिती उघड झाली आहे. ही घटना बार्शी शहरातील उपळाई रोडवरील शेंडगे प्लॉट येथे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पूनमचे पती बालाजी निरफळ हे त्या दिवशी धाराशिवला गेले होते. पत्नीने सकाळी फोन करून तुळशी विवाहानिमित्त येताना ऊस आणण्यास सांगितले होते. मात्र सायंकाळी ते परतल्यावर घर बंद असल्याचे लक्षात आले. कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यावर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत दिसली. पोलिस तपासात पूनम आणि आरोपी केतन यांच्यातील ५-६ वर्षांपूर्वीचे मोबाईल मेसेज आढळले असून, त्यावरून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले. सीसीटीव्हीमध्ये केतन घरातून बाहेर पडताना दिसला. त्यानंतर काही तासांतच तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. पूनमच्या पतीने सांगितले की त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले – “केतन काका वारंवार घरी यायचे आणि आईला शिवीगाळ व मारहाण करायचे. आई म्हणायची की हे कोणाला सांगू नकोस.” या खुलाशानंतर प्रकरण अधिक गंभीर स्वरूपाचं झालं आहे. पोलिसांनी आरोपी केतन प्रकाश जैन याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.