तर काँग्रेसला यापेक्षाही मोठी किंमत चुकवावी लागेल !

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने मोठे यश मिळविले. या यशाला हुरळून न जाता मित्रपक्षांबरोबर सहमतीचे राजकारण करून आणखी जोमाने तयारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे इतके पानिपत झाले नसते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याने देशपातळीवर इंडिया आघाडी आज फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जर तसे झाले तर मतांची फाटाफूट होऊन आगामी काळात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला यापेक्षाही मोठी किंमत चुकवावी लागेल.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर त्याचा आनंद राज्यातील काँग्रेस नेत्यांना टिकविता आला नाही. सत्ता आपलीच येणार या आवेशात नेतेमंडळी राहिली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होऊन समन्वय राहिला नाही. लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झालेल्या महायुतीने नियोजनबद्ध प्रचार करून महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. केंद्रात तीनवेळा सत्तेवर असलेला भाजप आपल्या घटक पक्षांबरोबर बेरजेचे राजकारण करत असेल तर देशव्यापी असलेल्या काँग्रेसनेही प्रादेशिक पक्षांना न दुखवता राजकारण केले तरच कॉंग्रेसला पराभवाची नामुश्की टाळता येईल. २०१४ पासून लोकसभा आणि महाराष्ट्रातील अडीच वर्षांचा कालावधी वगळता काँग्रेसला सत्ता मिळविता आली नाही. देश व राज्यस्तराप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही काँग्रेस हद्दपार झाली. एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघ, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांवर वर्चस्व राखलेली काँग्रेस आजच्या घडीला अस्तित्वहीन झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माळशिरस, माढा या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या तीन आमदारांना निवडून आणले. मात्र, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार निवडून यावेत म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाने ठोस प्रयत्न केले नाहीत. लोकसभा निवडणुकीत सोलापूर भाजपमुक्त झाला होता. त्याची विधानसभा निवडणुकीत परतफेड करून भाजपने काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार केले. इतक्या मोठ्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाकडून पक्षाला सावरण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. पक्षाचे

सोलापूर

अप्पासाहेब गंचिनगोटे

संघटन नाही. ग्रामस्तरावर शाखा नाहीत. प्रामाणिक व निष्ठावंतांची नेतृत्वाकडूनच दखली जात नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची स्थिती प्रादेशिक पक्षांपेक्षा हीन झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर खापर फोडून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत धवलसिंह यांनी माढा मतदारसंघात भाजपला पाठिंबा दिला होता. तरीही काँग्रेसच्या नेतृत्वाने धवलसिंह यांना हटवून दुसरा जिल्हाध्यक्ष नेमण्याची हिंमत दाखवली नाही. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सिध्दाराम म्हेत्रे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर शहर मध्य या तीन मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व काही प्रमाणात टिकून होते. आता तेथेही काँग्रेस अस्तित्वहीन झाली. नाना पटोले यांनीही आपल्याला प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी हायकमांडकडे केली आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतरच नूतन जिल्हाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीने निवडणूक लढविण्यातच महाविकास आघाडीचे भले आहे. सध्या जनमत महायुतीच्या बाजूने असल्याने महायुती मजबूत स्थितीत असून स्वबळावर लढल्यास काँग्रेसला आणखी मोठ्या पराभवास सामोरे जावे लागेल.