काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष अद्यापही ठरेना !

विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडून झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षबदलाच्या चर्चेला, तयारीला सुरुवात झाली आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविरुध्द विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद जगजाहीर होत आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला नागपुरात विधानसभा, विधान परिषद सदस्य व विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करतील. नव्या सरकारला भिडणाऱ्या प्रदेशाध्यक्षाचा शोध यानिमित्तातून घेतला जाऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षाचा शोध संपत नसल्याचे दिसत आहे.

५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदेशाध्यक्ष झालेल्या नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात आपल्याला चार वर्षे झाल्याचे सांगितले. आता या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपध्दतीबद्दल काँग्रेस नेत्यांची कुणकुण अधून-मधून ऐकू येत होती. कधी ही कुणकूण पश्चिम महाराष्ट्रातून असायची तर कधी मराठवाडा अन् विदर्भातून असायची. लोकसभा निवडणुकीत एका खासदारावरून राज्यातील एक नंबरचा पक्ष अशी कामगिरी झाल्याने ही कुणकुण क्षीण झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने तिचे रुपांतर आता कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात झाले आहे. निकालानंतर माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या शांततेला मोकळी वाट करून दिली. त्यानंतर दिल्लीतील घडामोडींचा हाच धागा पकडून विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारीही प्रदेशाध्यक्षांवर निश्चित करून टाकली.

विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवत काँग्रेसने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समित्या, महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी पक्षसंघटनेत नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेत्रिथला यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यानंतर विजयापेक्षा पराभवाचीच अधिक चर्चा झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचलेला दिसत होता. काँग्रेसच्या नेतृत्वासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधीच योग्य असल्याची अनेकदा जनमानसांत चर्चा होत होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रियांका गांधी यांनी लोकसभेत मांडलेल्या प्रभावी मुद्यांमुळे, आक्रमक भाषणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसत आहे. अंबादास दानवे यांच्या रुपाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक २० आमदारही याच पक्षाकडे आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील संख्याबळ पाहता काँग्रेसला येथे विरोधी पक्षनेत्याची संधी आहे. उध्दव ठाकरे यांची मर्जी व महाविकास आघाडीचा घर्म सांभाळत हे पद काँग्रेसच्या पदरात पाडून घेण्यासाठीही येत्या काळात हालचाली दिसू शकतात. महाराष्ट्रात १९६० ते २०२४ या ६४ वर्षात काँग्रेसने २८ प्रदेशाध्यक्ष दिले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना १९९० व १९९३ अशी दोनवेळा संधी मिळाली. आतापर्यंतच्या ६४ वर्षांत कॉंग्रेसने १३ वर्षे विरोधातील वगळता जवळपास ५१ वर्षे सत्तेत काढली आहेत. सध्या देशात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता नाही. विरोधात काम करण्याची सवय असलेल्या नेतृत्वाला आता प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्यास काँग्रेसला भविष्यात नक्कीच अच्छे दिन येऊ शकतात.