राज्यात काँग्रेसची 'इकडे आड तिकडे विहीर' तशी अवस्था

आपल्याकडे एक म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर तशी अवस्था आता महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाची झाली आहे. सगळीकडूनच कॉंग्रेस पक्ष आता अडचणीत सापडला आहे. शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढणं हे किती महागात पडले याचा अंदाज आता काँग्रेसला आला आहे. २०१९ ला महाविकास आघाडी स्थापन करताना भले उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी गळ्यात गळे घातले असतील पण काही काळातच गळ्यातला हात काँग्रेससाठी कधी फास झाला ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. खरं म्हणजे काँग्रेस हा तळागाळात खेडोपाडी रुजलेला पक्ष पण आज त्याची अवस्था अशी झाली आहे की या पक्षाला महाराष्ट्रात काही किंमतच उरली नाही. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या काळात इतक्या कमी जागा कपीच निवडून आल्या नव्हत्या. लोकसभेच्या वेळी पूर्णपणे अभ्यास करून तयारीनिशी काँग्रेस उतरली पण नंतर काँग्रेसचे नेते हवेत गेले आता काय आपणच येणार. या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काँग्रेस पार रसातळाला गेली.

आता सहा महिने आधी अभ्यास केला. छान मार्क्स मिळाले. आता काही अभ्यास करण्याची गरज नाही असे म्हणून जर सहा महिन्यांनंतर परीक्षा द्याल तर अपयश येणारच. प्रत्येक परीक्षेच्या आधी अभ्यास करायचा असतो हे बहुदा काँग्रेस नेते विसरले असावे आणि त्यांना भाजपला हलक्यात घेणं महागात पडलं. आता इथे दोन पक्षांची तुलना करण्याचे कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांची लढाई ही एका अधर्थाने त्यांच्या पक्षाशी होती. कोण वरचढ आहे हे त्यांना दाखवायचं होतं त्या उद्देशाने ते लढत होते. त्यामुळे दोन्हीकडे उरले ते मोठे पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप, आता नीट बारकाईने विचार केला तर पाणी कुठे मुरतंय हे लक्षात येईल.

मूळ समस्या आहे ती काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीची. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र काँग्रेसमध्येच सातत्याने खटके उडतात. कोणी कोणाचं ऐकत नाही. अंतर्गत काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. यानंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. यामध्ये काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्या. काँग्रेसला पहिल्यांदाच महाराष्ट्रात एवढ्या कमी जागा मिळाल्या. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष कुठेतरी संपत चालला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसची ही अवस्था का झाली? यावर आता चर्चा होत आहेत. हेवेदावे, रूसवे फुगवे, नेतृत्वगुणांचा अभाव एकमेकांच्या तक्रारी दिल्लीत बसलेल्यांना सांगणं, एकमेकांचे पाय खेचणं हेच सुरू आहे. पण हा सगळा सावळा गोंधळ बघून भाजपने मात्र पक्षात अनेक बदल केले. संघटनात्मक बांधणी करून शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन पहिला नंबर गाठला आणि दुसरीकडे निकाल लागल्यानंतर नीट अभ्यास केला नाही हे मान्य करण्याऐवजी पेपर चुकीचा होता. चेक करणाऱ्यांनी घोळ घातला, अशी धातुरमातुर कारण देऊन ईव्हीएमवर काँग्रेसने खापर फोडले. आता काँग्रेसमध्ये जर पाहिलं तर सामूहिक नेतृत्वाची पद्धत आहे. अशीच पद्धत भाजपमध्ये २०१३ पर्यंत होती. २०१३ मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली. त्यानंतर झालेल्या २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट हा चढताच राहिला.

सामूहिक नेतृत्वातून राज्यातील भाजप बाहेर पडली. महाराष्ट्रातील भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असा मेसेज त्यांनी दिला. महाराष्ट्रातील कॉंग्रेस सामूहिक नेतृत्वातून बाहेर पडणार हे असेच गुरफटत जाणार हा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व करेल असा नेताच नाहीये. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भांतले. विदर्भ त्यांना मानतो, पण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र इकडे त्यांचा जोर नाही. आता बाळासाहेब थोरात हे पश्चिम महाराष्ट्रातले पण त्यांना विदर्भ किंवा दुसरीकडे फार कोणी मानणार नाही. अचानक पक्षाचे नेतृत्व करणार कोण आणि कसं? काँग्रेस पेक्षा इतर पक्षांचे नेतृत्व चांगले म्हणजे शिवसेना म्हटले की एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी म्हटलं की अजित पवार, उबाठा म्हटलं की उद्धव ठाकरे आणि पवारांची राष्ट्रवादी म्हणलं की शरद पवार हे समीकरण डोळ्यासमोर येते; पण काँग्रेस म्हटलं की नाना पटोले हे पटकन डोळ्यासमोर येत नाही.

आता इकडे उद्धव ठाकरेंनासुद्धा काँग्रेस सोबत जाणं किती मूर्खपणाचं होतं याचा साक्षात्कार झालाय म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्यासोबत लढल्या तर मुंबई महानगरपालिका हातातून निघून जाईल, अशी भीती आता ठाकरे पिता- पुत्राला वाटू लागली आहे. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा द्यायला सुरुवात केली. पवारांच्या राष्ट्रवादीचा तर काही बोलायलाच नको कारण कधी आपला पक्ष अजित पवारांसोबत जाऊन राष्ट्रवादीत विलीन करतील आणि सठेत जाऊन बसतील हे सांगता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष एकाकी पडलाय म्हणजे ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे हा माझा मार्ग एकला असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्र काँग्रेसवर आली आहे. कॉंग्रेसने या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून पक्षाच्या पातळीवर मोठे बदल करण्याची गरज आहे.