आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि आचार्य अत्रे यांच्या बाणेदार पत्रकारितेचे खरे वारसदार हे लघू वृत्तपत्रच आहेत : दत्ता थोरे

सोलापूर (प्रतिनिधी): मोठ्या आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये वाढीस लागलेल्या व्यावसायिक दृष्टीकोनांमुळे त्यांच्यावर अनेक स्तरांच्या बंधनामुळे सध्याच्या परिस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि आचार्य अत्रे यांच्या बाणेदार पत्रकारितेचे खरे वारसदार म्हणून लघू वृत्तपत्र, साप्ताहिकच कार्यरत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, प्रकाशक तथा वक्ते दत्ता थोरे यांनी केले. असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅन्ड मिडीयम न्यूजपेपर्स अ‍ॅन्ड एडीटर्स आणि वंदे मातरम् पत्रकार संघ आयोजित पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ चा स्थापना दिन आणि मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून बोलत होते.

            रंगभवन चौक येथील समाजकल्याण केंद्राच्या सभागृहात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे अधिक्षक अंबादास यादव, असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅन्ड मिडीयम न्यूजपेपर्स अ‍ॅन्ड एडीटर्सचे राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंह सेंगर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिलीप जोशी होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकूणच कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी विविध पदांवर, विविध भाषांमधून, विविध क्षेत्रात निर्माण केलेल्या मार्गदर्शक अशा कार्याची माहिती दिली. ‘दर्पण’ या पाक्षिक वृत्तपत्रामधील 2 स्तंभीय रचनेचे वैशिष्ट्य विशद करताना त्यांनी सांगितले की, वृत्तपत्रांनी समाज आणि शासन यातील दुवा म्हणून कार्य केले पाहिजे असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या ‘दर्पण’ मध्ये  सर्वसामानांना समजावी म्हणून मराठी तर त्याच अडचणींची जाणीव तत्कालीन ब्रिटीश प्रशासनाला व्हावी यासाठी इंग्रजी अशा दोन भाषांच्या दोन स्तंभाचा बाळशास्त्री यांनी वापर केला होता, आजच्या वृत्तपत्रांनीही समाज आणि शासन यांना समजेल अशा भाषेत तर लेखन केले तर नक्कीच या बदलत्या काळातही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत राहील असे दत्ता थोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक  असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅन्ड मिडीयम न्यूजपेपर्स अ‍ॅन्ड एडीटर्सचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा वंदे मातरम् पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश तुरेराव यांनी केले. दोन्हीही संघटनांनी स्थापनेपासून केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा मांडला तसेच नुकत्याच लागू झालेल्या प्रेस अ‍ॅन्ड रजिस्ट्रेशन व पेरीऑडीकल्स अ‍ॅक्ट 2023 बाबत सर्व संपादक पत्रकारांनी अभ्यास करावा, सदर प्रक्रियेत होणार्‍या बदलांबाबत दररोज येणारी नवीन माहिती अद्ययावत करून नोंदीत ठेवावी असे सांगितले. तसेच लघू वृत्तपत्रांना येणार्‍या अडचणीच्या सोडवणूकीसाठी संघटना निरंतर तत्पर राहील याची ग्वाही दिली.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी सांगितले की, लघू वृत्तपत्रांना फार मोठा वारसा लाभला आहे, मात्र बदलत्या काळातील स्थित्यंतरांबरोबर लघू वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षीक, मासिक व नियतकालिकांच्या संपादक पत्रकारांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम आपल्या लेखणीतून - विश्लेषणातून केल्यास वाचकांतून नक्कीच प्रतिसाद मिळतो. तसेच राज्य शासन आणि राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणार्थ राबविल्या जाणार्‍या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दुवा म्हणून कार्य करणार्‍या जिल्हा माहिती कार्यालयाकडे येणार्‍या प्रत्येक अर्जाला योग्य तो प्रतिसाद देण्यात येईल. सकारात्मक पत्रकारिता, लोककल्याणाचे व्रत घेवून केली जाणारी पत्रकारिता आज लघुवृत्तपत्रांनी जपली आहे, मात्र कांही अल्पसंतुष्ट लोकांचे कारस्थान हे देखील त्याची दुसरी बाजू आहेच, मात्र नकारात्मक पत्रकारितेकडे दुर्लक्ष करत जिल्हा माहिती कार्यालय आपली सेवा निरंतर देत आले आहे आणि देत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            या कार्यक्रमास लघुवृत्तपत्र क्षेत्रातील संपादक, पत्रकार, छायाचित्रकार, वार्ताहर आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅन्ड मिडीयम न्यूजपेपर्स अ‍ॅन्ड एडीटर्सचे जिल्हाध्यक्ष तथा साप्ताहिक ‘श्रीसंकेत’ चे संपादक महादेव जंबगी यांनी केले.

पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्रांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्या : अंबादास यादव (अधिक्षक, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन)

वृत्तपत्र क्षेत्राच्या सुसुत्रीकरण आणि सबलीकरणासाठी केंद्र शासनाने नव्याने लागू केलेल्या जनसंवाद अ‍ॅक्ट 2023 मधील तरतुदींचा, तसेच पत्रकार कल्याण निधीच्या योजनांचा लाभ घ्यावा. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आजारातील आर्थिक मदतीसाठीही केंद्र शासनाने तरतूद केली आहे त्याचाही लाभ पत्रकारांनी घ्यावा, याबाबत कसलीही अडचण असेल तर सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा याबाबतीत सगळ्या प्रकारची मदत केली जाईल.