हद्दवाढ भागात भीषण पाणीटंचाई आठ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

सोलापूर, दि. 9- शहराच्या विस्तारित हद्दवाढ भागातील बहुतांश नगरांना कमी अधिक प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. नीलमनगर भागातील कुंभारीकडे जाणार्‍या ईश्वरनगराला आठ दिवसांआड पाणी मिळत असल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. नळ पाणीपुरवठ्याची सुविधा नाही. आठ दिवसांआड टँकर येतो. त्यावर पाण्याची गरज भागत नाही. त्यामुळे लवकरात लवकर नळ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ईश्वरनगरातील नागरिकांनी केली आहे.

शहराच्या हद्दवाढ भागामध्ये शेकडो नगरे आहेत. हद्दवाढ भागात राहणार्‍या नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दर तीन महिन्याला एक नगर वसत आहे. आकाशवाणी, नीलमनगर परिसर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, विमानतळ परिसरातील वसाहती आदी नगरांमध्ये कामगार आणि कष्टकरी राहतात. त्यांना मध्यमवर्गीयांप्रमाणे जारचे पाणी विकत घेणे शक्य नाही. दररोजच्या गरजेला वापरण्यासाठी हातपंपांवर अवलंबून राहावे लागते. परंतु हातपंपही बंद असल्याने महापालिकेच्या टँकरवर अवलंबून असण्याशिवाय येथील नागरिकांकडे दुसरा पर्याय नाही. सायकल व मोटारसायकलींना घागरी बांधून दूर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. महापालिकेकडून सहा ते आठ दिवसांआड हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी पाण्याचा टँकर पाठविला जातो. टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी महिलांची तुंबळ गर्दी होते. महिला एकमेकांवर तुटून पडतात. त्यातून संघर्ष होतो. पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. टँकर वेळेवर येत नाही. आठ दिवसांआड येणार्‍या टँकरमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान दोन दिवसांआड टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

पाण्याची गरज कशी भागवावी

नीलमनगर भागातील ईश्वरनगरमध्ये नळ पाणीपुरवठ्याची सोय नाही. येथील नागरिकांनी नळाद्वारे पाणीपुरवठा होण्याची नागरिकांकडे मागणी केली. परंतु अजूनही जलवाहिनी टाकली नाही. काही दिवसांपर्यंत पाच ते सहा दिवसांआड पाण्याचा टँकर येत होता. आता आठ दिवसांआड टँकर येतो. त्यामुळे आम्ही पाण्याची गरज कशी भागवावी. पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून?

नागूबाई मंजुळे

हातपंपाची व्यवस्था नाही

ईश्वरनगर आणि परिसरात कुठेही हातपंप नाही. दररोजच्या वापरासाठी हातपंपाचे पाणी वापरता येते. परंतु महापालिकेने हातपंपाची व्यवस्था केली नाही. पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. पाण्याचा टँकर वेळेवर येत नाही. टँकर आल्यानंतर महिला आणि पुरुष पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे टँकरच्या खेपा वाढवाव्यात.

सुशीला केंगरे

दोन घागरी पाणी मिळते

ईश्वरनगरसह परिसरातील काही नगरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. टँकर नियमित येत नाही. आठ दिवसांआड टँकर नगरात येतो. काही वेळेतच टँकरमधील पाणी संपते. टँकर येण्याच्या अगोदरच घागरी, बादल्या, बॅरल व मिळेल ती भांडी घेऊन नागरिक वाट बघत असतात. प्रत्येक नागरिकांना दोनचार घागरीच पाणी मिळते. त्यावर लोकांची गरज भागत नाही. त्यामुळे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा वाढवावा.

यल्लम्मा अलकुंटे