सेल्फीचा मोह जीवावर बेतला! अमळनेरमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे सेल्फी काढण्याचा मोह तिघा अल्पवयीन मुलांच्या जीवावर बेतला. मंगळवारी सायंकाळी खाण परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. पाण्यातील बेटासारख्या उंचवट्यावर सेल्फी घेत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलांची नावे मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) अशी असून तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र खाण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथे पाण्यातील एका उंचवट्यावर पोहोचल्यानंतर सेल्फी काढत असताना एका मुलाचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलाने हात धरला, तर त्यालाही ओढ लागल्याने तिसऱ्याने मदतीचा प्रयत्न केला. मात्र तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. देवळी येथील दीपक मोरे यांनी धाडस दाखवत पाण्यात उडी मारून तिघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

तिन्ही मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्यामुळे खाणी, धरणे, नद्या आणि जलाशयांमधील पाण्याची पातळी आणि खोलीचा अंदाज येत नसल्याने प्रशासनाने नागरिकांना अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.