स्कूल बस, रिक्षांमधून जाणार्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर
.jpeg)
सोलापूर, दि. 9-स्कूल बस आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहन चालकांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून बेलाटीजवळ शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पालकांची चिंता वाढविली आहे. नियम धाब्यावर बसून विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूल बस आणि रिक्षा चालकांकडे आरटीओ व पोलिसांचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष मुलांच्या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.
विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने नियमावली बनविली आहे. या नियमावलींचे काटेकोरपणे पालन होते की नाही, हे पाहण्याची आरटीओ, पोलीस आणि शाळा व्यवस्थापन यांच्यावर जबाबदारी आहे. परंतु शैक्षणिक सत्र सुररू होण्याच्या वेळीच हे सर्व निकष या यंत्रणांकडून पाहिले जातात. नंतर वर्षभर याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. मनात येईल तेव्हा आरटीओकडून अचानक स्कूल बसची पाहणी केली जाते. परंतु रिक्षांमधून होणार्या विद्यार्थी वाहतुकीकडे आरटीओ आणि पोलिसांची यंत्रणा पोहोच नाही.
बेलाटीजवळील एका शाळेच्या स्कूल बसमधून पडून मंगळवारी अनुराग तिप्पण्णा राठोड या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. ज्या स्कूल बसमधून तो दररोज शाळेत जात होता त्याच बसखाली या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. घटना अत्यंत हृदयद्रावक होती. विद्यार्थी आणि पालकांचे हृदय पिळवटून टाकणारी होती. ज्या बसखाली ही दुर्घटना घडली त्या बसमध्ये पुरुष आणि स्त्री सहायिका होते का? जर असते तर ही दुर्घटना घडलीच कशी याची सखोल चौकशी झाली पाहिजे. बर्याच स्कूल बसमध्ये पुरुष आणि स्त्री सहायिका नसतात. त्यामुळे गर्दीमध्ये चढताना व उतरताना खाली पडून मुलांचा अपघात होऊ शकतो.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते. त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये असणार्या या स्कूल बसची आरटीओकडून तपासणी होत नाही. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. शहरी भागात परवान्यापेक्षा विनापरवाना रिक्षांमधून विद्यार्थ्यांची अधिक वाहतूक होते. मासिक भाडे कमी होईल म्हणून पालकही रिक्षांमधून मुले किती जातात, याची चौकशीही करीत नाही. पाहिले तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. रिक्षांच्या दोन्ही बाजूला मुलांचे दप्तर लटकाविलेले असतात. रिक्षाच्या मागील बाजूस खाली पाय सोडून विद्यार्थी बसतात. शहर पोलिसांच्या समोरूनच चौकातून विद्यार्थी कोंबलेल्या रिक्षा धावतात. परंतु अशा रिक्षा चालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. आरटीओ कार्यालयाकडून परवानगी घेतलेल्या रिक्षांपेक्षा अवैध व विनापरवाना रिक्षांमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक अत्यंत धोकादायक आहे. या रिक्षा चालकांकडे वाहनांची कोणतीही कागदपत्रे असत नाहीत. रिक्षावर विमा नसतो. त्यामुळे दुर्घटना घडल्यास मोठी किंमत चुकवावी लागते. आरटीओ व शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दर पंधरा ते वीस दिवसांआड स्कूल बस व रिक्षांची तपासणी केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होईल, अशी पालकांची अपेक्षा आहे.
76 स्कूल बसवर कारवाई
मोटार वाहन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांची वाहतूक न करता नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 76 स्कूल बसच्या चालकांवर कारवाई केली. त्यातील पाच वाहने अटकावून ठेवली आहेत. दोषी आढळलेल्या स्कूल बसच्या चालकांकडून 11 लाख 8 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून नियम मोडणार्या स्कूल बसच्या चालकांवर कडक कारवाई सुरू आहे.
गजानन नेरपगार प्रादेशिक परिवहन अधिकरी, सोलापूर