परमगुरु-जगदैकगुरू-जगद्गुरू शिवयोगी सिद्धरामेश्वर

बाराव्या शतकात होऊन गेलेल्या शरणांमध्ये आज उपलब्ध
असलेली सर्वाधिक वचने शिवयोगी सिद्धरामेश्वरांची आहेत. वचनांप्रमाणेच
सिद्धरामेश्वरांच्या मंदिर व इतर स्मारकांची संख्या आणि शिलालेखांची संख्याही मोठी
आहे. सिद्धरामेश्वरांचा इतिहास सांगणार्या शिलालेखांची संख्या 31 आहे. आतापर्यंत
उपलब्ध झालेल्या संशोधनानुसार इतर शरणांच्या तुलनेत ही संख्याही सर्वाधिक आहे. सिद्धरामेश्वरांशी
संबंधित बहुतेक शिलालेखांची निर्मिती बाराव्या आणि तेराव्या शतकात झाल्याचं दिसून
येतं. शिलालेखांमध्ये सिद्धरामेश्वरांचा उल्लेख ‘परमगुरु, परमाराध्य, अनादीसिद्ध, जगदैकगुरू,
जगद्गुरू, परमेश्वरीश्वर, पुरुषलिंगम, निजद पुरुषलिंगम’ यासह विविध विशेषणांनी
अत्यंत गौरवपूर्ण रीतीने केला आहे. शरणांच्या पाऊल खुणांचा अभ्यास करताना
बहुचर्चित असलेल्या फडकेनूर शिलालेखात (1256) सिद्धरामय्या विषयी ‘स्वच्छंद
मृत्युंजयम’ ‘सिद्धकुळवार्धिवर्धन सुधाकरम’ असा उल्लेख आहे. कावेरी ते गोदावरी
खोर्यात पसरलेल्या आणि मराठी, कन्नड, तेलुगू
या बहुभाषिक प्रदेशात सिद्धरामेश्वरांचा मोठा प्रभाव होता. महाराष्ट्रातील आजच्या
धाराशिव जिल्ह्यापासून कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यापर्यंत सिद्धरामेश्वर
यांच्या विषयीचे शिलालेख आढळतात. देवगिरीचे यादव, गोव्याचे
कदंब, विजयनगरच्या राजांकडून सिद्धरामेश्वरांचे आराध्यदैवत
‘कपिलसिद्ध मल्लिकार्जुनास’ दानपत्र दिल्याचे हे शिलालेख इतिहासाची साक्ष देत
आहेत. इतकेच नव्हे तर कल्याणमधील रक्तरंजित उत्पात घडून राजा बिज्जळाच्या
मृत्यूनंतर गादीवर आलेला त्याचा भाऊ कर्णदेवाने आपल्या राज्याभिषेक सोहळ्यात
आशीर्वाद देण्याची विनंती करणारे निमंत्रण सिद्धरामेश्वरांना दिले होते. या वरून
सिद्धरामेश्वरांचा लौकिक आणि जनमानसातील उन्नत प्रतिमा लक्षात घेण्यासारखी आहे. सामान्यतः
शिलालेख ज्या राजा अथवा चक्रवर्तीशी संबंधित असतो, त्या
शिलालेखात त्या त्या राजाचे, सरदाराचे किंवा नायकाच्या
शौर्याचे वर्णन प्रथम केले जाते. मात्र सिद्धरामेश्वरांशी संबंधित असलेल्या
शिलालेखांमध्ये सर्वप्रथम सिद्धरामेश्वरांचे वचन, त्यानंतर
सोन्नलगी-सोलापूरचे महत्त्व, सिद्धरामेश्वरांचे आराध्य दैवत
मल्लिकार्जुनाची महती, त्यानंतर दान दिलेल्या चक्रवर्ती
राजा-दंडनायक यांचा उल्लेख येतो. ही सिद्धरामेश्वरांची थोरवी आहे. चोरगी, संख, कोडगी, टाकळी, गुंडकर्जगी, फडकेनूर, कोळीसाले,
जतगी, बुडरसिंगी, कोटबागी,
संगूर, यडहळ्ळी आणि चडचण आदी शिलालेखांमध्ये
सिद्धरामेश्वर यांच्या वचनांच्या उल्लेखासह वरील क्रमाने तपशील असल्याचे दिसून
येते. सिद्धरामेश्वरांशी संबंधित असलेला जुना शिलालेख म्हणजे
चोरगीचा शिलालेख होय. 1190च्या या
शिलालेखांमध्ये सिद्धरामेश्वरांचा ‘योगीगळ मनद कोनेय ज्योतिश्वर’ योगियांच्या
मनाचा अखेरचा ज्योतिश्वर’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. सोन्नलगी या गावाची
निर्मिती करून ‘योगरमणीय क्षेत्र, अभिनव श्रीशैल’ अशी
प्रतिष्ठा मिळवून दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखामध्ये सिद्धरामेश्वरांच्या
कर्तृत्वाचा पैस नेमकेपणे मांडण्यात आला आहे. सिद्धरामेश्वरांचा उल्लेख असलेले
सुमारे 31 शिलालेख आज उपलब्ध आहेत. या शिलालेखांमध्ये सिद्धरामेश्वरांच्या
व्यक्तिमत्त्वाची थोरवी गात असतानाच सोन्नलगी या गावाचाही ‘दक्षिण वाराणसी,
अभिनव श्रीशैल’ अशा शब्दात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. सेवण
राज घराण्यावर शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा
मोठा प्रभाव असल्याचं एकूण शिलालेखांच्या तपशिलावरून दिसून येते. सेवण राजांनी
अथवा त्यांच्या सरदारांनी सिद्धरामेश्वरांना अर्पण केलेल्या शिलालेखाच्या
सुरुवातीला ‘सोन्नलापूरद कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवालयक्के’ सोन्नलापूरच्या
कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवालयासाठी’ दान दिल्याचा उल्लेख आहे.
चोरगी
शिलालेखामध्ये सिद्धरामेश्वरांच्या वचनाचा उल्लेख आहे. ‘श्री ओम जय परमेश्वर
परमात्मा’ अशा वचनाच्या आठ ओळी उद्धृत करण्यात आल्या आहेत. कटनुर शिलालेखांमध्ये
‘जगदैकगुरू सिद्धराम’ ‘निजद पुरुष लिंगं सन्नुत गुरूसिद्धराम’ अशा उपाधींनी
गौरविले आहे. तर चडचण, कोळीसालेे आणि संगूरच्या शिलालेखांमध्ये ‘श्री रामनाथने शरणु, श्रीसिद्धरामनाथ शरणु’ अशी सुरुवात करून वचन उद्धृृत करण्यात आले आहे.
तसेच बुडरसिंगी शिलालेखामध्ये सिद्धेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन पाहता
शिलालेखकर्त्याच्या प्रतिभेला दाद द्यावी लागेल ‘श्री परमगुरु सिद्धरामम्, पाप हरम्’ असा उल्लेख आहे. भक्तांचे पाप नष्ट करणारे, लोकोद्धारासाठी मानवी रूपात अवतार घेतलेले सिद्धरामेश्वर त्रिनेत्रधारी सिद्धेश्वरांना
शरण गेलेल्यांच्या जीवनात असाध्य असे काही नाही. अशा आशयाचे तपशील 1252 सालच्या या
शिलालेखात आहेत. यावरून सिद्धरामेश्वर यांची समकालीन समाजातील थोरवी सहज लक्षात
यावी. शिलालेखांचे अभ्यासक प्रा. डॉ. मंजुनाथ पाटील यांनी आपल्या ‘शासनगळल्ली
सोन्नलिगे सिध्दराम’ या संशोधन ग्रंथात सिद्धरामेश्वरांशी संबंधित असलेल्या 31
शिलालेखांचे तपशीलवार विश्लेषण केले आहे. ज्येष्ठ संशोधक हुतात्मा प्रा. डॉ. एम.
एम. कलबुर्गी यांनी आपल्या ‘शासनगळल्ली शिवशरणरू’ या पुस्तकात सिद्धरामेश्वर
यांच्याशी संबंधित असलेल्या शिलालेखावर
सविस्तर चर्चा केली आहे. या ग्रंथामध्ये
सिद्धरामेश्वरांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेत असताना डॉ. कलबुर्गी म्हणतात
‘शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे समकालीन
जनतेसाठी गुरु म्हणून तर नंतरच्या काळात देव म्हणून प्रसिद्ध झाले.
सिद्धरामेश्वरांना गुरुस्थानी मानणार्यांची संख्या जितकी मोठी, त्याहून मोठी संख्या त्यांना देव म्हणून त्यांची उपासना करणार्यांची
असल्याचे दिसून येते. एकूणच शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या ज्ञात या 31
शिलालेखांच्या अभ्यासानंतर गुब्बी (1896) येथील शिलालेखाचा अपवाद वगळता उर्वरित 30
शिलालेख 12 वे 14 वे शतकादरम्यान सुमारे दीडशे वर्षांच्या कालावधीत निर्माण
झाल्याचे दिसून येते. सिद्धरामेश्वरांच्या एकूण व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वाचा पैस
समजून घेण्यासाठी या शिलालेखांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. सोलापूरला प्रती
श्रीशैल केलेल्या सिद्धरामेश्वरांची अनुभव मंटपाचे तिसरे अध्यक्ष म्हणून सोलापूरला
‘प्रती कल्याण’ केल्याची थोरवी सर्वमान्य आहे.
-चन्नवीर भद्रेश्वरमठ
योगियांचे योगी :- कल्याण पर्वातील ज्येष्ठ शरण सोड्डळ बाचरस यांनी ‘योगीगळ योगी शिवयोगी सोड्डळा, सिद्धाराम नोब्बने शिवयोगी’ अशा शब्दात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा गौरव केला आहे. खुद्द सिद्धरामेश्वर यांनीही ‘भक्त नादडे बसवण्णनंतागबेकु, जंगम वादडे प्रभूविनंतागबेकू, योगीयादडे नन्नंतागबेकू... (भक्त झाल्यास बसवण्णांप्रमाणे व्हावे, जंगम झाल्यास प्रभुदेवाप्रमाणे व्हावे आणि योगी झाल्यास माझ्याप्रमाणे व्हावे) असे म्हटले आहे. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर योगियांचे योगी - योगी कुलचक्रवर्ती या उपाधीने गौरविले जाणारे एकमेव शरण आहेत.
‘लोकैकनाथ’ ‘परमाराध्यम’ ‘स्वच्छंद मृत्युंजयम’ :- शरण संस्कृतीचा अभ्यास करत असताना फडकेनूर शिलालेख महत्त्वाचा मानला जातो. 96 ओळींच्या या शिलालेखात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या व्यक्तित्वाचे तपशीलवारपणे वर्णन केले आहे. या शिलालेखामध्ये सिद्धरामेश्वर यांच्या लोकप्रियतेबद्दल, त्यांच्या समाजसेवेबद्दल, क्रियाशीलतेबद्दल आणि काव्यशास्त्र पांडित्याबद्दल सविस्तरपणे वर्णन केले आहे. सिद्धरामेश्वर हे मोठे साधक आणि सिद्धी पुरुष असल्याचे हा शिलालेख सांगतो. ‘अनादीसिद्ध असलेले जगप्रसिद्ध असलेले’ अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्वं या आठ सिद्धी (अष्टसिद्धी) प्राप्त केलेले आहेत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत. ‘सिद्धकुळवार्धीवर्धन सुधाकर’ असलेल्या सिद्धरामेश्वरांच्या अनुग्रहाने स्वर्गलोक, मृत्युलोक आणि पाताळलोक पावन झाले आहेत. परमाराध्य असलेले सिध्दरामेश्वर वेद वेदांतावर प्रभुत्व मिळवलेले अधिकारी पुरुष आहेत. याशिवाय साधना आणि सिद्धीच्या मार्गावरील सर्व अडथळे पार करून लोकैकनाथ सिद्धेंद्र चक्रवर्ती झाले आहेत. या शिलालेखांमध्ये कवीने सिद्धरामेश्वरांचा ‘लोकैकनाथ’ ‘परमाराध्यम’ ‘आत्मज्योती निदर्शनम’ ‘स्वच्छंद मृत्युंजयम’ अशा विशेषणांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यामुळे शिवयोगी सिद्धेेश्वर हे समकालीन शरणांच्या तुलनेने व्यापक लोक कल्याणकारी होते. त्यांचा भक्त संप्रदाय आणि शिष्य वर्गही मोठा असल्याचे शिलालेखावरून दिसून येते.