कांद्याच्या दारात सुधारणा

नाशिक : गेल्या काही दिवसात घसरणीच्या फेऱ्यात अडकलेल्या कांदा
उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मंगळवारी कांद्याच्या दारात सुधारणा झाल्याचे वृत्त आहे. येथील
लासलगाव बाजारसमितीमध्ये कांद्याचए दर ३२ शे पर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले. मागील १० दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक कमी
झाल्यामुळे लासलगाव कांदा आगारात कांदा दरात सुधारणा झाली असून, अजून भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्या अखेर बाजार
समितीत तीन लाख ८३ हजार २८० क्विंटल कांदा आवक झाली, तर
किमान भाव १,००० ते कमाल ३,५३५ रुपये
आणि सर्वसाधारण भाव ३,१०० रुपये प्रतिक्विंटल होता. राज्यात
होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदालागवड मागील वर्षाच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने
वाढून ५.३४ लाख हेक्टरवर गेली आहे. रब्बी हंगामात १०६ लाख टन कांदा उत्पादन
होण्याचा अंदाज आहे. राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त ३१ लाख टन
असल्यामुळे आणि निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे यंदाही दरात मोठी पडझड होऊन
कांदा कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा,
सोलापूर, धुळे, जळगाव,
धाराशिव, बीड, छत्रपती
संभाजीनगर, भंडारा, नंदूरबार आणि लातूर
या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांत जानेवारीअखेर ५.३४ लाख हेक्टरवर कांदालागवड
झाली आहे. मागील वर्षी ४.६५ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत
जानेवारीअखेर ७० हजार हेक्टरने कांदालागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी कांदालागवडीतून
१०६.८ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात फलोत्पादन आणि औषधी
वनस्पती मंडळ (एनएचएम), महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ,
राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेवाय), नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), बाळासाहेब ठाकरे कृषी
व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) आणि शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कांदा
चाळी अशी राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता सुमारे ३० लाख ७८ हजार ४३१ टन आहे.
सध्या कांदा निर्यातीवर २० टक्के निर्यातशुल्क लागू आहे. शिवाय कांदा निर्यात धोरणात
सातत्य नसल्यामुळे कांदा दरात पडझड होऊन यंदाही कांदा कोंडी होण्याची भीती व्यक्त
होत आहे.