गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना; ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने शहरातील गणेशोत्सव मंडळांना विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजनेअंतर्गत ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ करण्यात आला. मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयात ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. गणेशोत्सव मंडळांना परवाना काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी आधार कार्ड आणि अध्यक्षांचा फोटो घेऊन येणे आवश्यक असल्याचे ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी सांगितले.

ही परवाना सेवा दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. परवाना प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा आवश्यक मार्गदर्शनासाठी मल्लिनाथ याळगी – 9730872087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा आणि परवाना प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन श्रीशैल बनशेट्टी यांनी केले. यावेळी ट्रस्टी कार्यालय चिटणीस मल्लिनाथ याळगी, गणेश चिंचोळी, दिलीप पाटील, संतोष खंडेराव, बसवराज वाले, तुषार सिताप यांच्यासह सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.