आई-मुलीची रेल्वेसमोर उडी; सोलापुरात दुहेरी आत्महत्येने खळबळ
सोलापूर शहरातील होटगी रोडवरील आयकर भवनाच्या पाठीमागील रेल्वे
ट्रॅकजवळ रविवारी पहाटे एका महिलेने आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसह धावत्या
रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे
परिसरात शोककळा पसरली असून शहरभर हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे वर्षा पांडुरंग अधटराव (वय ३३) आणि स्वरा
पांडुरंग अधटराव (वय १४, रा. सुशील नगर, विजापूर रोड,
सोलापूर) अशी आहेत.
माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर–टिकेकरवाडी रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक ४५८/३ सी जवळ दोघी गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जी. एस. मणुरे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री वर्षा अधटराव आणि त्यांच्या पतीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर त्या आपल्या मुलीसह घराबाहेर पडल्या. पहाटेच्या सुमारास त्या होटगी रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पोहोचल्या आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.