मराठी वृत्तपत्रांनी सातत्याने मराठी भाषेचे संवर्धन केले

सोलापूर : मराठी भाषेत वेगळं सामर्थ्य आहे. ती एकमेकांना जोडते. मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. मराठी भाषा आणि पत्रकारिता एकमेकांना पूरक असून मराठी भाषेचं सौंदर्य वृत्तपत्रांनी पत्रकारितेतून अधिक समृद्ध केले आहे. मराठी भाषेचा संवर्धन पत्रकारितेने नियमितपणे केले आहे, असा सूर मान्यवर पत्रकारांच्या चर्चासत्रातून व्यक्त झाला.
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरिय शाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे " मराठी भाषा व पत्रकारिता" या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात माजी संपादक अभय दिवाणजी, दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक प्रमोद बोडके आणि महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे आदी मान्यवर पत्रकारांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी मान्यवर पत्रकारांनी या चर्चासत्रात अभिजात दर्जा , मराठी भाषेचे महत्व , इतिहास, पत्रकारितेतील मराठी भाषा, भाषा सौंदर्य आणि संवर्धन, व्याकरण, बातमी वरील संस्कार यासह मराठी पत्रकारितेचा इतिहास मांडला. विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकला.
माजी संपादक दिवाणजी म्हणाले,मराठी भाषा ही अधिक समृद्ध अशी भाषा आहे. सर्वांनी मराठी भाषेचा उपयोग निश्चितच केला पाहिजे. सोलापुरात विविध प्रकारच्या २१ भाषा बोलल्या जातात. त्यात मराठी भाषेमध्ये विविध परिसरात वेगवेगळी शैली आहे. मराठी भाषेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. तारखिळेपासून ते आजचे संगणक अशा टप्प्यातून पत्रकारितेमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. आज हवा तसा मथळा संगणकावर घेता येतो. काहीही अडचण येत नाही. मुद्रितशोधनाचे काम आता संगणकच करतो असे सांगत प्रसिद्ध झालेल्या बातम्यातील व्याकरणाच्या चुका विनोदी शैलीत मांडल्या.
मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची : प्रशांत जोशी,
मराठी भाषेच्या संवर्धनात मराठी पत्रकारितेचे योगदान फार मोठे असल्याचे सांगून दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी म्हणाले, मराठी वृत्तपत्रांनी सातत्याने मराठी भाषेचे संवर्धन केले आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी वृत्तपत्रातूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि समाजप्रबोधन केले. आज देश स्वतंत्र झाला, स्वराज्य मिळाले पण सुराज्य निर्माण करण्याचे काम मराठी वृत्तपत्रातून केले जात आहे. लोकजागृती घडवली जात आहे. सोलापूर शहरातील पुतळ्यांच्या अनावरणाचा प्रश्न लोकजागृतीमुळे कसा सुटला याचे उदाहरण जोशी यांनी दिले. मराठी भाषेचे अस्तित्व टिकावे, संवर्धन व्हावे ही जबाबदारी समाजातील सर्व घटकांप्रमाणे वृत्तपत्रांची देखील आहे आणि आजची
वृत्तपत्रे ती पार पाडत आहेत, असेही ते म्हणाले.
प्रमोद बोडके म्हणाले, पत्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी, बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी राज्य शासनाने यशदाच्या धरतीवर संस्था निर्माण करावी अशी मागणी राज्य अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदुभाऊ जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाने राज्य शासनाकडे केली आहे.अशी संस्था कार्यान्वित झाल्यास राज्यातील पत्रकारिता आणि पत्रकार अधिक समृद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पत्रकारितेचे अधिक योगदान नक्कीच मिळेल.याचा अप्रत्यक्ष फायदा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होईल, असे प्रमोद बोडके यांनी सांगितले.
उपसंपादक किरण बनसोडे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात मराठी पत्रकारितेने मोठे योगदान दिले आहे. मराठी वृत्तपत्रातून दररोज मराठी भाषेचे संवर्धन आणि सौंदर्य जपण्यात आले आहे. मराठी भाषा ही जोडणारी भाषा आहे. मराठी भाषेच्या वेगवेगळ्या अंतरावर विविध शैली ऐकायला मिळतात. ही एक रसाळ गोमटी भाषा आहे. पत्रकारितेतून मराठी बाणा मांडण्यात आला आहे. मराठी पत्रकारितेत संस्कार महत्त्वाचे ठरतात. आजही नैतिक मूल्य पत्रकारितेत जपली जात आहे, असे किरण बनसोडे यांनी सांगितले.
मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी मसाप जुळे सोलापूरचे कार्यवाह गिरीश दुनाखे, मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे , अ.भा. मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी , मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, उद्यान विभाग अधीक्षक किरण जगदाळे आदींसह महापालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी , कर्मचारी नागरिकांनी , साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते