सोशल मीडियाच्या रागातून पतीकडून पत्नीची हत्या; पंढरपुरात धक्कादायक उलगडा
पंढरपूर : तालुक्यातील एका हत्या प्रकरणात
धक्कादायक खुलासा झाला असून पत्नी सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असल्याच्या
रागातून पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात आरोपी
पती हरी सरवदे याला अटक करण्यात आली आहे. मृत महिला ऐश्वर्या सरवदे हिचा १२ मार्च
रोजी गुरसाळे येथील पुलाजवळ नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या
अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सुरुवातीला हा
प्रकार लैंगिक अत्याचारानंतरच्या हत्येसारखा भासवण्यासाठी आरोपीने मुद्दाम बनाव
रचल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात १२ मार्च रोजी
हरी सरवदे यानेच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांना
संशय आल्याने तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीनेच ९ मार्च रोजी पत्नीचा
खून केल्याचे उघड झाले. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह एक दिवस घरातच ठेवला
होता. मुलांना संशय येऊ नये म्हणून तो त्यांना घराबाहेर घेऊन जात होता. त्यानंतर
दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरून गुरसाळे येथे नेऊन फेकण्यात आला. तसेच, गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने पत्नीचा मोबाईल सुरू करून तिच्या नावाने बाहेर
गेल्याचे भासवणारे संदेशही टाकले होते. मात्र मृतदेहावरील दागिने आणि काळ्या
दोऱ्याच्या आधारे, तिच्या मैत्रिणीच्या मदतीने ओळख पटली आणि
संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.