मोहोळ–१३ मैल–वळसंग ८१ किमी नव्या रस्त्यासाठी ७४० कोटींच्या निधीला मंजुरी
सोलापूर : जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या
विकासासाठी मोठा टप्पा गाठला गेला असून मोहोळ–१३ मैल–वळसंग या ८१ किमी लांबीच्या
नव्या रस्त्यासाठी तब्बल ७४० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही
माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात
आला आहे. या मार्गावर सध्या मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच
शेतमालाची मोठ्या प्रमाणावर ने-आण होत असल्यामुळे वाहतूक ताण वाढला आहे. परिणामी
अपघातांची संख्या वाढून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या नव्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाची
बाजारपेठेत जलद व कमी खर्चात वाहतूक करता येणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासालाही मोठी मदत होणार आहे. वारंवार होणारे अपघात
कमी होऊन वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी निधी मिळवण्यासाठी आमदार सचिन
कल्याणशेट्टी यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. लवकरच या
रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले
आहे.