उष्णतेचा तडाखा! यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट याचा अर्थ काय आहे?

नवीदिल्ली : एप्रिलच्या सुरुवातीलाच सोलापूर जिल्हातील तापमान ४२ अंश पार केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे संपूर्ण देशात उन्हाळ्याने कहर केला आहे. तापमान ४५ अंश सेल्सियसच्या वर पोहोचले असून, हवामान खात्याने काही राज्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये हीटवेव्हचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारतीय हवामान खात रंगकोडद्वारे म्हणजेच यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टद्वारे नागरिकांना संभाव्य धोका किती आहे, याची सूचना देते. हवामान विभाग उष्णतेचा परिणाम कसा असेल आणि त्यावर किती काळजी घ्यावी लागेल, यासाठी रंगांच्या आधारे अलर्ट देतो. यामध्ये यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट हे तीन प्रकार असतात. अलर्ट काय सांगतात?
यलो अलर्ट म्हणजे काय?
यलो अलर्ट ही सर्वात प्राथमिक सूचना
असते. म्हणजेच हवामानातील बदलांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, पण तो तत्काळ किंवा गंभीर स्वरूपाचा नसतो.
या अलर्टमध्ये सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात यलो अलर्ट त्याठिकाणी
दिला जातो जिथे तापमान ३५ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता असते. अशा
ठिकाणी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, पुरेसं पाणी
प्यावं आणि थेट उन्हात जाणं टाळावं, असं आवाहन केलं जातं.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
ऑरेंज अलर्ट ही दुसऱ्या पातळीची आणि
अधिक गंभीर सूचना असते. यामध्ये हवामान अधिक तापट आणि धोकादायक होण्याची शक्यता
अधिक असते. तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे
शरीरात डिहायड्रेशन, लू, अशक्तपणा यासारखे त्रास होऊ शकतात. या अलर्टमध्ये अनावश्यक बाहेर जाणं
टाळणं, पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे सूती कपडे वापरणं,
डोकं झाकूनच बाहेर जाणं आवश्यक असतं.
रेड अलर्ट म्हणजे काय?
रेड अलर्ट ही सर्वात गंभीर सूचना
असते. या अलर्टचा अर्थ असा की, अत्यंत तीव्र
उष्णतेमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. रेड अलर्ट तापमान ४५ अंशांपेक्षा
जास्त असताना जारी केला जातो. या वेळी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाणं टाळणं
आवश्यक असतं. उन्हाचा परिणाम मेंदूवर, हृदयावर आणि शरीरातील
पाण्याच्या पातळीवर होतो. म्हणूनच हा अलर्ट खूपगंभीरपणे घ्यावा लागतो.