लग्नातल्या आहेरापेक्षा शासनाचा जीएसटी मोठा...
.jpeg)
सोलापूर दि. ९- तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. अलीकडे जेवणाच्या ताटापासून सर्वच सेवांसाठी 'जीएसटी' भरावा लागत आहे. त्यामुळे लग्नासह सर्वच समारंभांच्या खर्चात वाढ झाली असून, सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. 'जीएसटी' लग्नकार्यातील खर्चाचा आकडा फुगवणारा ठरत आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येण्याच्या अहेरापेक्षा शासनाला मिळणारा 'जीएसटी'चा आकडा तुलनेने मोठा होत आहे.
लग्नकार्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक वर- वधू पक्षाचा कल असतो. थाटात लग्नकार्य करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढून खर्च करण्याची तयारीदेखील केली जाते. मध्यमवर्गातील एका लग्नसोहळ्यासाठी साधारणपणे चार ते सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. या खर्चाची सुरुवात लग्नाचे कपडे खरेदीपासून सुरू होते. कपडे खरेदी करताना कर लागतो. त्यानंतरच्या प्रत्येक खर्चावर कर भरावा लागतो. निमंत्रण पत्रिका, कार्यालय ते जेवणापर्यंत सर्वच गोष्टींना आता कर भरावा लागतो. या काही ठिकाणी बिल एकत्रित करून जीएसटी दाखविला जात नाही. मात्र, वधू- त वरांच्या खिशातून तो वसूल केलाच जातो. किराणा, गॅस, केटरर्स, प्रवास, लग्नाआधी तसेच लग्नकार्यात पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवा, विविध विधींचा मेकअप डेकोरेशन आदींचा खर्च वाढला आहे.
हौस पूर्ण करण्यासाठी रिसेप्शनचा पर्याय वायफळ खर्चाला फाटा देत काही जण नोंदणी पद्धतीने विवाहाला प्राधान्य देत आहेत. मात्र, त्यानंतर काही जण पाहुणे व ओळखी परिचयातील लोकांसाठी रिसेप्शन देतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. लग्नातील हौस पूर्ण करण्यासाठी रिसेप्शनचा उत्तम पर्याय आहे. रिसेप्शनसाठी कमीत कमी दोन लाखांपासून पुढे खर्च केला जात आहे. त्यासाठीही अनेक सेवांवर जीएसटी भरावा लागतो. मात्र, बहुतांश ठिकाणी एकत्रित पैसे वसूल केले जातात. जीएसटीच्या नावाखाली उकळतात अतिरिक्त पैसे लग्नकार्य करताना मंगल कार्यालय, डेकोरेशन, केटरर्स, तसेच अन्य सेवा घेताना बहुतांश जण जीएसटी टाळण्यासाठी पक्के बिल देत नाहीत. मात्र, वधू- वरांच्या पालकांकडून जीएसटीच्या नावाने अतिरिक्त पैसे उकळले जाता असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.