माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी बस तिकिटासाठी रांगेत !

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा, कुटुंबीयांचा थाट आता काही नवीन राहिलेला नाही. माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्याही थाटात कोणत्याही प्रकारची कमतरता आलेली नसते. पण एक काळ होता, काही नेते होते, ज्यांचे कुटुंबीय या थाटापासून दूर राहायचे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांची पत्नी असलेली महिला बसचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभी राहिलेली आहे, यावर आताच्या पिढीचा तसूभर तरी विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही, कारण अपवाद वगळता, आताच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, त्यांच्या कुटुंबीयांचा झगमगाट लोकांचे डोळे दीपवून टाकणारा असतो. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास अत्यंत समृद्ध, संपन्न असा आहे. आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारे अनेक नेते, मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले आहेत. मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे त्यापैकीच एक. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असलेला, पेपर विकणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, यावर आताचे राजकारण पाहिले की कोणाचाही विश्वास बसणार नाही. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जात असताना राजकारणातील नीतीमत्ता मात्र लयाला गेल्याचं चित्र आज दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या पिढीतील तत्त्वनिष्ठ नेत्यांचं स्मरण दिलासा देणारं ठरत आहे.
मारोतराव कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी १९०० रोजी चंद्रपूर येथील भानापेठ येथे सांबशिव आणि गंगूबाई या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळं मारोतरावांना अर्ध्यावरच शिक्षण सोडावं लागलं होतं. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचंही शिक्षण होऊ शकलं नाही. गरिबी, अर्धवट शिक्षण या बाबी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अडथळा ठरल्या नाहीत. कोणत्याही जातीचं पाठबळ नसतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यामुळेच त्यांचा राजकीय प्रवास आश्चर्यकारक, थक्क करणारा असा आहे. हिंगणघाट येथे गोपिकाबाई यांच्याशी दादासाहेबांचा विवाह झाला. गोपिकाबाई यांच्या माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पतीच्या घरी दारिद्र्य असतानाही त्यांनी जबाबदारीनं, मोठ्या हिमतीनं संसाराचा गाडा हाकला. गोपिकाबाई यांना काही काळ नोकरीही करावी लागली होती. त्याकाळी त्यांना दरमहा २५ रुपये वेतन मिळत असे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी नोकरी करत असताना गोपिकाबाई यांनी दादासाहेबांना त्यांच्या सामाजिक कार्यातही साथ दिली. नागपूरमध्ये १९५९ मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष गोपिकाबाई होत्या. हे अधिवेशन भव्य-दिव्य असं झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. . अधिवेशनाची भव्यता, आयोजनातील नेटकेपणा पाहून काँग्रेस नेत्यांनी कत्रमवार यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. यामुळं दादासाहेब आणि गोपिकाबाई हे दोघेही भारावून गेले नव्हते, असं सांगितलं जातं. त्याला कारण होतं, हे कुटंब स्वबळावर, स्वतःच्या हिमतीने पुढे आलेलं होतं.
गोपिकाबाईंनी काही काळ नोकरी केली होती. उदरनिर्वाहासाठी त्यांनी खाणावळही चालवली होती. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा शिरणे शक्यच नव्हते. दादासाहेब हे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९५७ मध्ये ते मुंबई राज्यातील सावली मतदारसंघातून निवडून गेले होते. १९६२ मध्ये ते पुन्हा याच विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मुख्यमंत्रिपदावर असतानाच २४ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांचं निधन झालं होतं. १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झालं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात जावं लागलं होतं. त्यामुळं दादासाहेबांना मुख्यमंत्रिपद मिळालं. मध्यप्रदेशात समाविष्ट असलेला विदर्भ प्रांत १९५६ मध्ये महाराष्ट्रात आला होता. दादासाहेबांचे अनेक रंजक किस्सेही आहेत. दादासाहेब देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. आवेशात भाषण करण्याची त्यांना सवय होती. ते पट्टीचे वक्ते होते. भाषण करताना ते ग्रामीण भागातील म्हणी, दैनंदिन जीवनातील उदाहरणं द्यायचे. त्यामुळं त्यांचं भाषण रंगत असे. त्यामुळे जोशात येऊन ते पुढं पुढं जायचे. त्यांना रोखण्यासाठी एक शक्कल लढवण्यात आली होती. त्यांच्या शर्टला मागच्या बाजूने दोरी बांधली जायची. ते पुढं पुढं चालले की मागून कुणीतरी ती दोरी ओढत असे. ही सूचना पंडित नेहरू यांनी केली होती, असं सांगितलं जातं.
दादासाहेब मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेच्या सफाई
कामगारांनी संप केला होता. जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ
दादासाहेबांना भेटायला गेलं होतं. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी दादासाहेबांचं निधन
झालं. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्याच्या महिनाभरानंतर दादासाहेबांच्या पत्नी
नागपूरच्या बसस्थानकावर दिसल्या होत्या. ही साधी बाब नव्हती. आजच्या पिढीला ती
कदाचित खरी वाटणारही नाही. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलेल्या
गोपिकाबाई बसचं तिकीट काढण्यासाठी स्थानकावर रांगेत उभ्या होत्या. राज्याच्या सर्वोच्च
पदापर्यंत पोहोचूनही दादासाहेब आणि गोपिकाबाई यांनी व्रतस्थ जीवन जगलं होतं, हा त्याचा पुरावा होता.