कोविड नंतरच्या अचानक मृत्यूंबाबत भीती आणि चर्चा

नवी दिल्ली – कोविड महारोगराईच्या काळानंतर देशात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अचानक मृत्यूंच्या घटना वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या मृत्यूंचा कोविड लसीकरणाशी काही संबंध आहे का, याबाबत अनेक अफवा पसरल्या. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे स्पष्टीकरण देत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी केलेल्या व्यापक अभ्यासानुसार कोविड लसीकरणामुळे अचानक मृत्यूचा धोका वाढत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ICMR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीने ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान 19 राज्यांतील 47 तृतीयस्तरीय रुग्णालयांमध्ये अचानक मृत्यू झालेल्या निरोगी व्यक्तींचा अभ्यास केला. "Factors associated with unexplained sudden deaths among adults aged 18-45 years in India" या नावाने झालेल्या या अभ्यासातून लसीकरण आणि मृत्यूमध्ये कोणताही थेट संबंध सापडला नाही. दरम्यान, AIIMS नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अभ्यासातून मिळालेल्या प्राथमिक माहितीमध्ये हृदयविकाराचा झटका हेच अनेक प्रकरणांमागील प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणांमध्ये आनुवंशिक दोषही संभाव्य कारण म्हणून पुढे आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, "कोविड लसीकरणामुळे अचानक मृत्यू होत असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे". अशा अफवांमुळे लस न घेण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सरकारने नागरिकांना आवाहन केले की, लसीकरण हा एक महत्त्वाचा आरोग्य सुरक्षा उपाय असून, वैज्ञानिक पुराव्यावर आधारित निर्णय घेणे आवश्यक आहे