चॅटजीपीटीच्या नवीन फीचर्सचा गैरवापर; बनावट आधार कार्ड प्रकरणाने खळबळ

ओपनएआयने गेल्या आठवड्यात चॅटजीपीटीच्या नवीन फीचर्सची घोषणा केली होती, ज्यामध्ये स्टुडिओ घिबली स्टाईलमधील फोटो तयार करण्याची क्षमता प्रमुख आकर्षण ठरली. या नवीन फीचर्समुळे सोशल मीडियावर अनेक कलात्मक आणि फोटोरिअलिस्टिक प्रतिमा व्हायरल झाल्या. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या मार्गाने केला जाऊ शकतो, असे संकेत आता मिळत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी चॅटजीपीटीच्या फोटो-जनरेशन फीचर्सचा गैरवापर करून बनावट आधार कार्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे फोटो खऱ्या आधार कार्डाच्या जवळपास जाणारे किंवा अगदीसारखेच दिसत होते, फक्त चेहऱ्यांमध्ये थोडे बदल जाणवत होते. या प्रकारामुळे डिजिटल सुरक्षा आणि एआयच्या जबाबदारीबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, एक्स (माजी ट्विटर) वरील काही युजर्सनी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांचे बनावट आधार कार्ड शेअर केले, ज्यामध्ये क्यूआर कोड आणि आधार क्रमांकही दिसत होते. हे फोटो इतके वास्तववादी होते की ते सहज कोणालाही दिशाभूल करू शकतात. या प्रकरणानंतर एआय कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या सुरक्षिततेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. एआयद्वारे अशा प्रकारचे महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज तयार होऊ शकतात, यामुळे भारतातील डिजिटल सिक्युरिटीसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.