दिवाळी

काळानुसार प्रत्येक व्यक्तीने बदलायला हवं यात शंका नाही.
कालानुरूप रुढी आणि परंपरांना छेद देऊन नव्या गोष्टी आत्मसात करणे जरुरीचे आहे
याबद्दलही दुमत नाही. परंतु असे करताना त्या गोष्टीतला आनंद हिरावून घेतला जात
असेल, पावित्र्य जोपासले जात नसेल, मूळ संकल्पनाच बदलत
चालली असेल, सणाचा इव्हेंट व्हायला लागला तर मात्र पुन्हा
एकदा नव्याने या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे समजायला हरकत नाही.
साधारणपणे चाळिशीच्या पुढे असलेल्या सर्व मित्रमैत्रिणीना नक्कीच पूर्वीची दिवाळी
आठवत असणार आणि नकळत का होईना परंतु या दोन्ही दिवाळीची तुलना करण्याचा मोह आवरत
नसणार. मलाही तो आवरला नाही आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच. साधारणपणे तीस
वर्षांपूर्वी दिवाळीच्या आगमनाची वर्दी मिळायची ती दसरा संपल्यानंतर. बाजारात
फिरताना सुगंधी साबण, सुवासिक तेल आणि उटण्यांची दुकाने
सजायला लागली, मिठाईच्या दुकानदारांनी पुढचा फुटपाथ व्यापून
आपले बस्तान मांडले की जाणवायचं दिवाळी जवळ आली आहे. किल्ले बनविण्याच्या
स्पर्धेची जाहिरात दिसायला लागली की जाणवायचं दिवाळी जवळ आली आहे. शाळा
कॉलेजेसमधून सुट्ट्या जाहीर व्हायला लागल्या, मामाच्या
गावाकडून सारखी आमंत्रणे यायला लागली, बाजारपेठांमध्ये गर्दी
दिसायला लागली, नवनवीन कपडे शोकेसमध्ये दिसायला लागले,
फटाक्यांची दुकाने सजायला लागली की जाणवायचं दिवाळी जवळ आलेली आहे.
आणि मग आपसूकच सगळ्यांचे पाय बाजारपेठेकडे वळायचे, घरातल्या
प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही खरेदी व्हायची, विशेषतः
लहान मुलांमुलींसाठी खरेदी करताना दहा ड्रेसची ट्रायल घेऊन अकरावा ड्रेस विकत
घेताना मजा यायची. दुकानदारही बिचारे न कंटाळता चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून इमाने
इतबारे काम करीत राहायचे कारण त्यांना खात्री असायची की ग्राहक खरेदी नक्कीच करणार,
कपड्याच्या दुकानाकडून मग मंडळी वळायची फटाक्यांच्या दुकानाकडे,
आपल्या ओळखीच्या दुकानदाराकडून स्वस्तात जास्त फटाके कसे मिळतील
याकडे आवर्जून वडिलांचे लक्ष असायचे. टिकल्या, लवंगी फटाके,
डांबरी माळा आणि धाडसी मुला-मुलींसाठी अॅटमबॉम्ब याच्याबरोबरच
फुलबाज्या, झाडे आणि भुईचक्कर यांची बजेट सांभाळून रेलचेल
खरेदी व्हायची. घरी पोहोचल्यानंतर शेजारच्या मुलामुलींमध्ये फटाक्यांचा स्टॉक
एकमेकांना दाखवून प्रचंड कॉम्पिटिशन व्हायची. त्याचबरोबर दुसरी
डॉ. सचिन जम्मा
कॉम्पिटिशन असायची ती छानसा किल्ला कोण बांधतो याची. चिकणमाती आणून पाण्यात भिजवून त्यापासून किल्ला बनविणे हे खरेच कष्टाचे परंतु अत्यंत आनंदाचे काम असायचे. हा किल्ला सजवण्यासाठी मग मावळे, झेंडे अशा अनेक वस्तूंची खरेदीही व्हायची. किल्ले बांधणे हा एक आनंदोत्सव असायचा आणि छोट्यांबरोबर मोठेही त्यात सामील व्हायचे. दुसरा आनंदोत्सव असायचा घरी आकाशकंदील बनविण्याचा. त्यातही लहानांबरोबर मोठे आपली हौस भागवून घ्यायचे. कॉम्पिटिशनच्या बाबतीत महिलावर्ग मागे कसा राहील? त्यांची कॉम्पिटिशन वेगळ्या लेव्हलला असायची, घरोघरी ताज्या बनविल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, खोबऱ्याची करंजी, खुसखुशीत चिवडा, खमंग चकली या पदार्थांना प्राधान्य मिळायचे. सुगरण स्त्रिया अनारसे आणि चिरोटे बनवून आपल्या पाककलेतल्या प्रावीण्याची बढाई मिरवायच्या. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीत मग फराळांच्या ताटाची देवाणघेवाण व्हायची. तेरी साडी मेरी साडीसे. अशी त्यात भावना असायची पण चटकदार फराळाचं कौतुकही तितकंच व्हायचं. प्रत्येक दारासमोर सुंदर सुबक रांगोळ्या रेखाटल्या जायच्या. प्रत्येक दिवशी कशी वेगवेगळी रांगोळी काढली जाईल याकडे कटाक्षाने लक्ष असायचं. आजूबाजूला खास कुंभाराकडून खरेदी केलेल्या पणत्यांची सजावट असायची. वर शांतपणे तेवणारा आकाशकंदील, उदबत्ती किंवा धुपाचा सुगंधी दरवळ, खाली मंद प्रकाश देणाऱ्या पणत्यांची आरास, सगळा आसमंत कसा मंगलमय व्हायचा. दिवाळीच्या दिवशी मग खरी धमाल यायची.. नरकात जाण्याची भीती दाखवून का होईना पण मुलांना पहाटे उठवले जायचे, डोळे चोळत उठलेली मुले मग उटणे आणि तेलाच्या रगडण्याने ताजीतवानी व्हायची. वर बंबातल्या कढत कढ़त पाण्याने घासून पुसून घातलेली आंघोळ, कडकडून भूक लागायचीच. मग ताज्या ताज्या फराळावर आडवा हात मारला जायचा. खरे तर हे सगळे घाईगडबडीने संपवायची मुलांची इच्छा असायची कारण त्यानंतरच फटाके उडवायला परवानगी मिळणार हे त्यांना माहिती असायचे. शेजारच्या बंटी आणि बबडी बरोबर अंगणात फटाके उडवताना मग खूप धम्माल यायची, लवंगी मिरच्यांची माळ सोडवून एकेक फटाका सुटा शेवटपर्यंत उडविण्यात जी मजा असायची त्याला कशाचीही सर नसायची. शेवटी न उडालेले फुसके फटाके एकत्र कचरा पेटवून उडविण्यात आनंदाचा परमोच्च क्षण असायचा.
दिवाळीला मंडळीही भरपूर जमायची. लहानग्यांची दिवाळी
मामाकडे साजरी व्हायची. माहेरी जाऊन निवांत राहण्याची ही सुवर्णसंधी सासूरवाशिणीला
मिळायची. जावयाचा दिवाळीसण हा सासरीच झाला पाहिजे हा आग्रह असायचा. विशेषतः नुकतंच
लग्न झालेलं असेल तर मग प्रश्नच नाही. पहिला दिवाळसण सासुरवाडीतच हे ठरलेलं
असायचं. प्रत्येक घर कसं नातेवाइकांनी, मित्रमैत्रिणींनी भरलेले असायचं.
गप्पाटप्पांत रात्रीची पहाट कधी व्हायची ते कळायचेच नाही. प्रायव्हसी, वेगळी बेडरूम या संकल्पना त्यावेळी कोणाच्या खिजगणतीतही नव्हत्या. फराळ
असो, जेवणावळी असोत किंवा गप्पाटप्पा सगळं कसं एकत्र
व्हायचं. दिवाळसण संपवून आपापल्या घरी निघताना मात्र प्रत्येकाचे डोळे भरून यायचे.
पुढच्या दिवाळीला भेटण्याच्या आणाभाका घेत आणि पोहचल्यावर पत्र पाठव बरं का! या
आग्रहाने रवानगी व्हायची.
आजची दिवाळी यापेक्षा खूप वेगळी आहे नाही का? अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची मोठाली पाकिटं किंवा बॉक्स घेऊन आता कुरियरवाला
वर्षातून अनेकवेळा घरी भेट देत असतो. नवे विविध प्रकारचे कपडे आणि इलेक्ट्रॉनिक
वस्तू घरपोच मिळाल्याने त्याचं काही अप्रूपच राहिलेलं नाही हे मान्य करायला हवं.
आणि आपली या प्रकारची दिवाळी खरे तर वर्षभर चालूच असते. त्यामुळे दिवाळीला वेगळी
खरेदी ही संकल्पनाच अस्तित्वात नाही राहिली आहे आता. नवे कपडे पाहण्याचे, त्यावरून हात फिरवण्याचे, त्याचा स्पर्श अनुभवण्याचे
आणि कपडे अंगावर लेवून आरशात पाहण्याचे, एकमेकांना
दाखविण्याचे सुखच या कंपन्यांनी हिरावून घेतले आहे. आता दिवाळीचा फराळ घरी बनवायला
वेळ आहे कोणाला? पती-पत्नी दोघेही कामावर जात असल्याने घरी
येता येता फराळांच्या दुकानांत डोकावून हवी तशी मोकाट महागडी खरेदी करणे किंवा
कामवाल्या मावशीकडून फराळ बनवून घेणे अथवा चक्क ऑनलाइन ऑर्डर देऊन खरेदी करणे हेच
पर्याय फक्त आता उरले आहेत. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या बरोबरची फराळाची
देवाणघेवाण केव्हाच बंद झालेली आहे. मोठमोठ्या दुकानांतून
विकत घेतलेली, काजू बदाम पिस्ता भरलेली सुंदर सुबक खोकी
जिथे आपला मतलब आहे अशा ठिकाणी नोकरांबरोबर पाठवून धन्य होतो आम्ही किल्ले
बांधण्याच्या स्पर्धा आता जवळजवळ इतिहासजमा होत चाललेल्या आहेत कारण प्रत्येक
मुलाजवळ महागडा स्मार्टफोन असल्याने त्यावरचे गेम मुलांना जास्त जवळचे वाटायला
लागले आहेत. रात्रभर जागून ग्रीटिंग्ज बनविणे, पत्रे लिहिणे
आणि मग ती पोस्टाने नातेवाइकांना, मित्रमैत्रिणींना पाठविणे
असल्या फालतू गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ आहे कुठे? काही
वर्षांपूर्वी आपण निदान दुकानातून ग्रीटिंग्ज खरेदी करून आठवणीने ती पोस्टाने
पाठवीत असायचो परंतु आता सोशल मीडियावर आलेले विविध मेसेजेस कॉपी करून त्यात
थोडाफार बदल करून हजारोंच्या संख्येने पाठविण्यात आपण तरबेज झालो आहोत. नवनवीन
ऑडिओ व्हिज्युअल मेसेजेस सोशल मीडियावर उपलब्ध असताना वेगळे असे श्रम घेण्याची
गरजच भासत नाही आपल्याला. कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाला आपला दिवाळी मेसेज
पोहोचला की झाली आपली दिवाळी साजरी! जवळची व्यक्ती किंवा नातेवाईक आहे असे वाटलेच
तर एखादा फोन कॉल अथवा व्हिडिओकॉल करुन हॅपी दिवालीच्या शुभेच्छा देणे एवढीच
औपचारिकता आता उरली आहे. आताही सगळे रात्री उशिरापर्यंत जागे असतात परंतु ते सोशल
मीडियावर, त्यामुळे पहाटे उठणे, अभ्यंगस्नान
करणे अशा गोष्टींना फाटा मारण्यात आलेला आहे.
पहाटे अकरा वाजता उठल्यानंतर झोमॅटोवर ऑर्डर करून इडली
वडा किंवा तत्सम पदार्थांचा फराळ आता केला जात आहे. दिवाळीत नातेवाइकांना भेटणे, माहेरी, सासरी किंवा मामाच्या गावाला जाऊन राहणे हे
थोडेसे 'मिडल क्लास' वाटायला लागले आहे
आपल्याला. त्यापेक्षा दिवाळीच्या दिवसांत एखाद्या रिसॉर्टवर जाऊन निवांत राहणे आणि
जमलंच तर छोटीशी फॉरेन टूर करणे हा फंडा जोर पकडतो आहे. रांगोळ्याही आता रेडिमेड
मिळायला लागल्या. रेडिमेड डिझाइनचे छाप मिळायला लागल्यापासून दोन बोटांची किंवा पाच
बोटांची रांगोळी ही कला विसरून गेलो आम्ही. मंगलमय वातावरण निर्मिती करणाऱ्या
पणत्यांची जागा केव्हा मेणबत्त्यांनी घेतली हे कळालेच नाही आम्हाला.
आकाशदिव्यांपेक्षा चायनीज बल्बच्या झगमगाटाने आपण सारे दिपून जायला लागलो. दिवाळी
अंक म्हणजे काय रे भाऊ? असे विचारण्याची वेळ आता आलेली आहे.
विकत घेतलेल्या फराळाच्या ताटाबरोबर सेल्फी काढून धन्य होणाऱ्या ललाना, झगमगीत चकचकीत लाइट्स समोर कुटुंबाचा फोटो काढून सोशल मीडियावर चमकणारे
आम्ही, हे विसरून चाललो आहोत की दिवाळसण हा कुटुंबीय,
नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींबरोबर एकत्र येऊन साजरा करण्याचा सण
आहे. भले तो साजरा करण्याची पद्धत बदलली असेल परंतु आपुलकी, मायेचा
ओलावा आणि नात्यातलं प्रेम हे टिकलंच पाहिजे. कुणा एका अनामिकेची सुंदर रचना उधृत
करून रजा घेतो.
काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत
सतरंजीवर, गप्पा मारीत बसावं!
नवरा बायको दोन
लेकरात दिवाळ सण असतो का?
गोड धोड खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का?
साबण
आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो,
चार
पाहुणें आल्यावरच, आकाशकंदील हसतो,
दोन दिवसासाठी का होईना जरूर एकत्र यावं,
जुने दिवस आठवताना, पुन्हा एकदा लहान व्हावं
पुन्हा एकदा लहान
व्हावं...