फाशी की जन्मठेप? अश्विनी बिद्रे प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली शिक्षा

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या खटल्यातील इतर आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा देण्यात आली. मात्र, त्यांनी आधीच तुरुंगात ही शिक्षा पूर्ण केल्यामुळे त्यांची लवकरच सुटका होणार आहे.

जन्मठेप म्हणजे नक्की काय?

लोकांमध्ये एक गैरसमज पसरलेला आहे की "जन्मठेप म्हणजे १४ वर्षांची शिक्षा". मात्र, भारतीय कायद्यानुसार हे खरे नाही. "जन्मठेप" म्हणजे दोषी व्यक्ती आयुष्यभर तुरुंगात राहणार, जोपर्यंत सरकार त्याला माफी किंवा सवलत देत नाही.

14 वर्षानंतर काय होऊ शकते?

कायद्यानुसार, दोषीने १४ वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर माफीसाठी अर्ज करू शकतो, पण त्यावर निर्णय घेणे सरकारच्या अधिकारात असते. प्रत्येक वेळी माफी मिळेलच, असे नाही.